“स्त्री आणि पुरुषांना कल्पकतेने आपल्या वापरातील आवश्यक असणारे कापडी प्रकार बनवण्याचे कौशल्य घरोघरी प्रत्येकाला येत होते. जुन्या झालेल्या कपड्याचा शेवटचा तुकडा देखील वाया जात नव्हता. कपड्यांचे धागे सुती , रेशमी किंवा लोकरीचे असत. या धाग्यांपासून, कपड्यांपासून काय बनवत असत! चांदवा, लांबण पिशव्या, झोळणा, गोधडी, वाकळ, घोगंती, घोगंता, घोंगडी, पडशी, मोरकी, गोंडे, कासरा, येसन, मुंगसं, खसनी, कुंची, कुलई, कडं,
मेंढीच्या जावळाच्या केसांपासून लहान बाळाला हातात घालण्यासाठी गोल कडंं तयार करतात. चांदवा बाळाच्या पाळण्यावर आयताकृती आकारांमध्ये, चारी बाजूने अडकवण्यासाठी कपड्याच्या गोलकड्या करतात. मध्यभागी गोल आकाराचा, पांढर्या रंगाचा चंद्राचे प्रतिक म्हणून कपडा वापरतात आणि पुर्ण गोलाकार म्हणजे मातृत्वामुळे स्त्रीला आलेले पुर्णतेचे प्रतिक असते. आकाशाची, निसर्गाची ओळख देण्याचे प्रतिक होय. आईच्या अंगाईगीत आणि गोष्टी मधून लक्षात येते. या पांढऱ्या चंद्रगोलाच्या बाजूने त्रिकोणी आणि चौकोनी आकारात, विविध रंगात, उपलब्ध असलेल्या कपड्यांचे छोटे छोटे तुकडे जोडून हा चांदवा तयार केला जातो. चांदव्याच्या खालच्या बाजूने बाळाला पाळण्यातून दिसेल असे रंगीत पुंगळ्या आणि कापडी लाल, निळ्या, पिवळ्या, हिरव्या रंगाच्या चिमण्या अडकवल्या जातात. या चांदव्यावर एक अखंड कपडा या तुकड्यांना जोडून सामान ठेवण्यासाठी वापर करतात. बाळाचे अंगडे, टोपडे, कुंची ठेवतात. चांदण्याच्या मधल्या भागांमध्ये कपड्याची थोडीशी खिश्यासारखी सारखी जागा सोडली जात असे ज्यामध्ये स्त्रिया आपले दागिने, पैसे ठेवत असत. बाळाची कुंची आणि कुलईला विविध रंगाचे गोंडे, आरसे लावून आकर्षक केले जात असे. लांबण पिशव्या, आपला हाताचा पंजा मधे जाईल एवढ्या खोलगट पिशव्या विविध रंगाचे कपडे वापरून अगोदर बनवून घेतल्या जात असत. त्रिकोणी आकारांमध्ये एक कपडा घेऊन या छोट्या पिशव्या पाच, चार, तीन, दोन व शेवटी एक या क्रमाने शिवून जोडल्या जातात. पिशव्यांच्या वरच्या बाजूला भिंतीला अडकवण्यासाठी गोल बंद बांधले जातात. या पिशव्यांमध्ये सुईदोरा, काजळ, गंधाची बाटली, गुट्टीचे सामान याशिवाय घरातील बारीकसारीक सामान ठेवल्या जात असे. या पिशवीला काच, मनी, आरसे लावून आकर्षक रूप दिले जात असे. कमरेला अडकवण्याचा तीन प्रकारच्या पिशव्या असतात. पुरुष वापरतात ती चंची आणि खसणी होय. चंचीमध्ये पान, चुना, कात ठेवल्या जात असे. आणि खसणी म्हणजे पट्ट्यासारखी चार बोटं रुंद कमरेला गुंडाळून, गाठ बांधता येणारी पिशवी असते. या पिशवीमध्ये विशेषकरून प्रवासात सोनं आणि पैसा ठेवला जात असे. स्त्रियांच्या कमरेला असलेल्या पिशवीमध्ये नशीची पितळी डब्बी, लाचकन, चिंचोका आणि पैसे ठेवतात. झोळणा, मध्यभागी खोलगट असलेली चार बाजूंनी बांधलेली खुंट्टीला अडकवून ठेवायची पिशवी होय. या झोळण्यामध्ये विविध प्रकारचे कपडे ठेवतात. भरजरी कपडे, लहान मुलांचे कपडे ठेवल्या जातात.
गोधडी सुद्धा छोटी-मोठी असते. गोधडी कपड्यांच्या दुहेरी, चौपदरी घड्या करून तयार करतात. वाकळ थोडीशी वेगळी असते रंगेबीरंगी, कपड्यांचे छोटे छोटे तुकडे जोडून वाकळ तयार करतात. वाकळेवरची दोऱ्याची टीप ही मुद्दामहूनन दिसेल अशी शिवतात. रंगीत आकर्षक दोरा वापरतात. या तुकड्यांच्या आतमध्ये जुनं नऊवारी, धोतर ज्या आकारात वाकळ बनवायची तेवढे टाकतात. घोगंती कुंची सारखी असते. डोक्यावर घेऊन गुडघ्यापर्यंत मागच्या बाजूने पांघरतात. थंडी पासून संरक्षण करण्यासाठी बनवतात. घोगंता हा पावसाळ्यात वापरतात. आंबाडीच्या सुतळीपासून बनवलेल्या पोत्याचा बनवतात. गुराखी याचा जास्त प्रमाणात वापर करतात. घोंगडी काळ्या किंवा पांढऱ्या लोकरीची असते. बैलाचा कासरा सूत कातून तयार करतात. येसन, मुंगसं अंबाडीच्या धाग्यापासून करतात. मोरकी, गोंडे बैलांच्या शिंगात अडकवण्यासाठी सूत कातून करतात. पडशी खास वारकऱ्यांसाठी, प्रवासात वापरली जाणारा प्रकार आहे. दिंडीला जाणार्या वारकऱ्यांना सामान ठेवण्यासाठी उपयोगी पडते. खांद्याला अडकवल्या नंतर हाताने सामान सहज घेता येईल तिची रचना असते. आतमध्ये अस्तर लावून दोन कप्पे तयार केलेले असतात. यामध्ये वारकरी आपले कपडे, खाद्यपदार्थ, लागणारे सर्व सामान या पिशवीमध्ये ठेवतात. सर्व प्रकारचे कपडे सहसा सुती धाग्यापासून शिवले जात असत. हा दोरा ज्या कागदाला गुंडाळला जात असे त्याला आट्ट्या असे म्हणतात. फावल्या वेळात स्त्रीयांच्या अभिव्यक्तीसाठी कर्नाटकी कशिदा हा प्रकार स्त्रिया खूप आवडीने उतरवत असत. कपड्यावर कशिदा उतरवणे म्हणजे एक पारंपरिक कलांपैकी एक उत्तम कला आहे. पूर्वी विशेष करून लाल, पिवळा, हिरवा, निळा रेशमी धाग्यांने हा कशिदा वापरला जात असे. चौफुली आणि साखळी टाका हा महाराष्ट्रातील आणि मग यामध्ये नंतर सिंधी, गुजराती वगैरे टाक्यांची भर पडली आणि ही कला आणखी समृद्ध होत गेली.
यासोबतच आरसा, काच, मणी लावण्याचे कौशल्य देखील छानच! धाग्यांच्या वेगवेगळ्या प्रकारांचा वापर करून वस्त्र तयार करण्याचे हे कौशल्यशिक्षण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे निरीक्षण, सहभाग यामुळे आपोआप घडत असते. वेगवेगळ्या सणावाराच्या निमित्ताने त्यांची ही अभिव्यक्ती सर्वांसमोर येत असे. एकमेकांना शिकवून जाते.
ग्रामीण भागात वापरले जाणारे बरेच वस्त्रप्रकार सर्वांना माहिती आहेत आणि आजही वापरले जातात. त्यातील काही प्रकार मात्र नामशेष होत आहेत….क्रमशः….
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
16 thoughts on “7.एक धागा….”
खूप सुंदर
प्रत्येक लेखात सखोल माहिती👌
आमच्या लहानपणची आठवण झाली अप्रतिम मांडणी
खरंच हा लेख वाचून डोळ्यासमोर त्या वस्तू दिसल्याखूप व खूप छान लेख आहे
खूप खूप अभिनंदन…
विसरत चाललेल्या वस्तूंची आठवण झाली खुप छान मॅडम
खूप छान माहिती संगीतलीत
खुप माहितीपूर्ण.. तरी अपूर्ण .. कारण एवढंसगळं सांगणारा अजूनही खुप काही सांगू शकतो..
विषय छान.. माहिती सखोल, वैविध्यपूर्ण आणि रंजक
छान!
👌🏻खुप छान माहिती दिली आहे .👍🏼
आजीच्या गोधडीची उब जाणवली 👌🏻👌🏻
खूप मस्त माहिती दिलीत मॅडम यातून खूप गोष्टी करून बघण्यासारख्या आहेत
खुपच सुंदर आणि सखोल माहिती
👌👌
छान
खुप माहितीपूर्ण.. तरी अपूर्ण .. कारण एवढंसगळं सांगणारा अजूनही खुप काही सांगू शकतो..
विषय छान.. माहिती सखोल, वैविध्यपूर्ण आणि रंजक
छान लेख आहे