शोभेच्या वस्तूंसाठी आपण मातीच्या भांड्याचे प्रकार वापरतो. वारली चित्रकला रेखाटून कुंड्या, फुलदाणी यासारख्या काही भांड्यांचा वापर करतो. सध्यातर चवदार, काहीतरी गावाकडचं, towards nature, ecofriendly वगैरे मध्ये सहभाग म्हणून मातीच्या भांड्यात, मातीच्या चुलीवर काही ठरावीक पदार्थ करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.या पद्धतीने खास वनभोजन आयोजित केली जातात.
भट्टीत भाजल्याप्रमाणे शेंगदाणे चवदार होण्यासाठी तसेेच पुरणाची पोळी मातीच्या तव्यावर भाजतात. फारच आवड असेल तर भाताचे प्रकार, बाजरीची भाकरी यासारखे ठराविक पदार्थ मातीच्या भांड्यात करतात. पाण्याची भांडी, रांजण, माठ, डेरा, बाटली, जग, पेला वगैरे सर्रास वापरतात.
गावाकडे धातूंच्या भांड्यापेक्षा मातीच्या भांड्यांचा वापर जास्त होत असे. घरातील स्त्रियांना ते हाताळण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागत असतील! भांड्याची साफसफाई कशी करत असतील! एकूणच काय, कसे वापरतात?
प्रत्येक गोष्ट निसर्गाचीच आणि पुन्हा निसर्गात नष्ट होणारी असते. कोणताही दुष्परिणाम न करता पर्यावरण रक्षणाचं हे मोठं उदाहरण आहे.
गावाकडे रांजण, कोथळी, डेरा, घागर, माठ, बिनगी, गाडगे, मोरवा, लोटकं, खोल्या, परात, कोटंब, बोळी, पणती, झाकणी वापरत असत.
स्वयंपाक, धान्य, मीठ, मसाल्या पासून अगदी खार (लोंंचं), दही, दूध, लोणी, तूपापासून सोजीच्या लाडूपर्यंत प्रत्येक जिन्नस वरील भांड्यात ठेवत असत. एकेकाची नावे आणि उपयोग, वापरायची पद्धत माहिती करून घेेेणे देखील रंजक आहे.
लादणीत आतून भिंतीच्या समोरासमोरील व दरवाजा नसलेल्या बाजूला उतरंड लावतात, रचतात. घरातील स्त्रीच्या उंचीनुसार, गुडघाभर उंचीवर दीड ते दोन फूट रुंद मातीचा ओटा करतात. त्यावर चुंबळीसारखे खोलगट आळे तयार करतात. डेरा व्यवस्थित बसतो अशी खात्री पटली की, मग दोनचार दिवस तो ओटा तसाच ठेवतात मग उतरंड रचायला सुरुवात होते. या ओट्याला आणि आळ्यांना एकत्रितपणे *बानवशी घालणे* असे म्हणतात. घराच्या आवश्यकतेनुसार पाच, सहा, सात… या संख्येत, भिंतीच्या लांबीनुसार उंतरंडी असतात.
उतरंड रचत असताना सर्वात खाली दोन थर डेऱ्याचे असतात. नंतर माठ, गाडगे, आणि लोटकं… या पद्धतीने रचतात. सर्वात वर लोटक्यावर मातीची टोपलीच्या आकाराची झाकणी असते. घरातील स्त्रियांच्या उंचीनुसार उतरंडीची उंची असते. या उतरंडीच्या विविध प्रकारच्या भांड्यात आकारानुसार आणि वापरानुसार सामान ठेवण्याचा उतरता क्रम असतो. उदा. नेहमी लागणार्याा वस्तू वरच्या भांड्यात आणि अधून मधून लागणाऱ्या वस्तू खालच्या भांड्यात म्हणजे काढणे आणि परत जागच्याजागी ठेवणे सोपे जाते.
तस पाहिलं तर लादणीत ऊन येत नाही. खूप मोठी, जास्त खणाची ( एक खण म्हणजे पुरूषांच्या कोपरापासून ते मधल्या बोटापर्यंतचे अंतर) लादणी असेल तर एखादा झरोका ठेवल्या जाऊ शकतो पण शक्यतो नसतोच. कोणतेही preservatives, रसायनं न टाकता देखिल सर्व साठवणीचे धान्य अगदी व्यवस्थित टिकते. कारण नैसर्गिक पद्धतीने या मातीच्या भांड्यातून हवा खेळती राहते. डाळी, कारळ, तीळ, व राळ्याचे तांदूळ, वरया, भरडलेल्या डाळींच्या चुरी, साळ, यासारखं सर्व सामान मातीच्या या उतरंडीमध्ये असते. या उतरंडीमध्ये स्त्रिया आपलेेेे दागिने, पैसे ठेवत असत.
मातीच्या लहान तोंडाच्या घागरी खास पाणी पिण्यासाठी साठवून ठेवत असत पाण्याची ने-आण करण्यासाठी वापरत असत. छोटी घागर म्हणजेच बिनगी देखिल पाणी आणण्यासाठी व ठेवण्यासाठी वापरतात. पूर्वीच्या काळी साथीचे आजार पसरले की मातीची पसरट परात आणि लोटकं आजारी व्यक्तीसाठी वापरत असत संसर्ग पसरू नये म्हणून अशी सुरक्षितता आणि काळजी देखील घेतली जात असे. मडक्यात पुरण, दुधाचा खरवस, डाळीच्या भरड भाज्या विशेषकरून बनवतात. दिवाळीत गायगोरस बारसेला तीन दगडावर बोळकी ठेवून ऊतू जाणारा दुधात शिजवलेला हातसडीच्या तांदळाचा भात मातीच्या भांड्यामुळे तर आणखी चवदार लागतो.
खोलगट वाटीसारखा आकार असणारे भांडे म्हणजे खोल्या होय. या खोल्यामध्ये विशेष करून वाटलेली कांद्याची चटणी ठेवली जात असे. कोटंब म्हणजे कुंडी उलट ठेवल्यासारख्या आकाराचे भांडे होय. दूध, दही, तूपाची भांडी झाकण्यासाठी या कोटंबाचा वापर केला जात असे. कोटंब उचलण्यासाठी थोडेसे जड असते. लहान मुले, मांजरी यांच्यापासून हे पदार्थ सुरक्षित राहतात धक्का लागून सांडत नाहीत.
या कोटंबाची एक गंमत आहे बरं! लवकर हालचाल न करणाऱ्या, बसून राहणाऱ्या, आळशी, जाड व्यक्तींसाठी कोटंबं हा शब्द उपहासात्मक वापरला जातो. उदाहरणातः पुरुष असेल तर ऊठ की कोटंब्या! आणि स्त्री असेल तर उठ की कोटंबे! अशा पद्धतीने हे बोलीभाषेत वापरले जाते.
आकारांमध्ये विविधता असणारा मोरवा! मिरवता येतो, छान दिसतो म्हणून तर नाव पडले नसेल! सध्याच्या फुलदाणीचे जेवढे विविध प्रकार आहेत ते मोरव्यापासून निर्माण झाले असतील असे वाटते. हा मोरवा अनेक प्रकारांमध्ये असतो. दही लावण्यासाठी विशेष करून वापरल्या जाते. याशिवाय अनेक गोष्टींसाठी वापरले जात असे पैसे, चिंचोके, बिबव्याची गोडंबी, खेळायच्या गुंजा, संग्रह करण्यासाठी, छोटी आणि थोडी वस्तू ठेवण्यासाठी कल्पकतेने वापरले जात असे.तोंडाला निमुळता खाली पसरट तर कधी खाली निमुळता, मध्यभागी फुगीर कुंभाराच्या कौशल्याने बनवला जात असे. हस्तकला अभिव्यक्तीचा उत्तम नमुना म्हणजे हा मोरवा.
विविध आकर्षक प्रकार या मोरव्यामधे दिसून येतात. याचीही एक गंमत आहे या मोरव्याचे जसे विविध आकार प्रकार असतात तसेच स्त्रिया पुरुषांच्या चेहऱ्यांचे देखील वेगवेगळे आकार असतात आणि म्हणून मोरवा हा शब्द देखील उपहासात्मक वापरला जातो. काम न करता फक्त गप्पा मारणाऱ्या व्यक्तींना नाव घेऊन म्हटले जाते. जा! मोरवा हिसळून ये आधी!! मंंग मोठाडं बोल!
बोळी संक्रांतीला वाणवसा करण्यासाठी वापरतात. लहान बाळाची टाळू माखण्यासाठी तेल या बोळक्यात वेगळं आणि सुरक्षित स्वच्छ ठेवतात. लहान मुलींच्या भातुकलीमध्ये, खेळभांड्यामध्ये सर्वात जास्त या बोळीचा वापर केला जातो. झाकणी, पणती तर माहिती आहेतच.
हे सगळे रोज वापरायचे, स्वच्छ करायचे, कसे?
याला *राखा लावणं* असे म्हणतात. माती, पितळ आणि तांब्याची भांडी यांना कोणताही निरमा, साबण न लावता सफाई करत असत त्याच पद्धतीने मातीची भांडी देखील पळसाच्या पानाच्या मुळ्या, नारळाच्या काथ्या यांंच्या साह्यानेेे साफ करता येतात . रात्री चुलीजवळ गप्पा मारत घरातील स्त्रिया निवांत बसून किंवा पहाटे चुलीतली राख तळहातावर घेऊन भांड्यावर घासून फिरवतात, साफ करतात, पाण्याने दोनदा विसळतात. ही भांडी निर्धोक बनतात. आत्ताच्या जाहिरातीतल्या सारखा भांड्यांमध्ये चेहरा दिसत नाही तरीही स्वच्छ होतात. वास येत नाही. जसजसा घरच्या स्त्रीचा हात या मातीच्या भांड्यांवरून फिरतो तसतसे ते मऊशार होतात. काळे कुळकुळीत होतात. पदार्थांची चव वाढत जाते. समजा कधी चुकून माकून घरातल्या स्त्रियांना राग आला तरी आता सारखा भांड्यांचा आवाज येत नाही बरं! तर मडकेे थेट भुईवर पडते आणि ते फुटल्याचे खापर कोणावर फोडले जात नाही हे विशेष ! घरधनी जरा शांत समजून घेणारा असेल तर हे मडके खाली फुटण्याऐवजी घरधन्याच्या हातात पडते….
हे खापरं सुद्धा कामाला येतात बरं! लहान पोरींचा संसार भातुकलीसाठी, केर भरायला, पक्षांना लादणीवर धान्य, पाणी ठेवायला, छोट्या लोटक्याला झाकणी, घराच्या पत्र्यावरून पावसाचे पाणी निघून जावे म्हणून पन्हाळी सारखा उपयोग करता येतो…. वगैरे वगैरे.या खापराचा सुद्धा कल्पकतेने उपयोग करते. घरात सुईच्या टोकावरचा संसार करणारी स्त्री असेल तर मग विचारायलाच नको! प्रत्येक वस्तूचा शेेवटपर्यंत, तुुकडे-तुकडे होईपर्यंत वापर करणे. निगुतीनं संसार करणं यालाच म्हणत असतील का!!….
क्रमशः
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
7 thoughts on “5.फिरत्या चाकावरी येई मातीस आकार….”
छान
मातीशी नातं सांगणारा.. प्रजापतींच महात्म्य सिंगणारा लेख.
खूप छान
खूप सुंदर लिखाण
आठवणी ला उजाळा मिळाला.मन प्रत्येक मातीच्या भांड्यात फिरुन आलं.👌👌👌
आमच्या घरी पण होती अशी मातीच्या मडक्याची उतरंड.👍👍💐💐
खूप सुंदरा लिहिलय गावाकडच शेतातला घर अगदी समोर उभ राहिल👌👌तुमच निरीक्षण खूप बारीक आहे👍👍