शब्दांची शक्ती

शब्दांची शक्ती : वाणीचं रूपांतर  करणारी ऊर्जा

मनुष्याच्या जीवनात वाणीला विशेष स्थान आहे. विचार, भावना, संस्कार यांना जगासमोर आणणारे साधन म्हणजे शब्द परंतु शब्द हे केवळ संवादाचे माध्यम नसतात; ते ऊर्जा रूपांतरित करतात, वर्तन घडवतात आणि अखेरीस व्यक्तिमत्त्व व जीवनाला आकार देतात. भारतीय तत्त्वज्ञानातील दृष्टिकोनातून परंपरेत वाणीला दैवी स्वरूप मानले गेले आहे. वेद व उपनिषदात “वाक् सूक्त” मध्ये वाणीचं गौरवगान आढळतं. येथे वाणीला सृष्टीचा आधार मानलं गेलं आहे.

भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, “अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत्” याचा अर्थ वाणीने इतरांना दुःख न देता सत्य, प्रिय आणि हितकारक असावं.

पतंजली योगसूत्रात शब्द, विचार आणि वृत्ती यांचं नातं खोलवर स्पष्ट केलं आहे. “चित्तवृत्ती”वर वाणीचा प्रभाव पडतो, आणि त्या वृत्ती वर्तनात बदल घडवतात. नादयोग आणि ध्वनी शक्तीनुसार भारतीय साधना परंपरेत “नाद ब्रह्म” ही संकल्पना आहे.

प्रत्येक अक्षर, प्रत्येक मंत्र हा विशिष्ट कंपन निर्माण करतो.

जप, स्तोत्र किंवा नामस्मरण यामुळे मनाची अस्वस्थता कमी होते, शरीरातील ऊर्जा संतुलित राहते.

उदाहरणार्थ, “ॐ” उच्चारताना शरीर आणि मनामध्ये एक विशेष लहरी निर्माण होतात ज्यामुळे ध्यान एकाग्र होतं. मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्स

आधुनिक मानसशास्त्र शब्दांच्या परिणामाकडे वेगळ्या नजरेने पाहतं.

न्यूरो-लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग (NLP) आपण जे शब्द वापरतो ते आपल्या विचारांचे “पॅटर्न्स” घडवतात.सकारात्मक/नकारात्मक सेल्फ-टॉक म्हणजे  सतत “मी काही करू शकत नाही” म्हणणारा मनुष्य स्वतःवरील विश्वास गमावतो. तर “मी करू शकतो” म्हणणारा व्यक्ती आत्मविश्वासी बनतो.

न्यूरोसायन्स सांगते की प्रत्येक शब्दामुळे मेंदूत न्यूरल पाथवे निर्माण होतात. त्या पथांवरून आपलं वर्तन, निर्णय आणि सवयी विकसित होतात. कंपन व ऊर्जा शास्त्र

प्रत्येक शब्द एक फ्रीक्वेन्सी निर्माण करतो. जशी एखादी संगीताची धून मनाला आनंद देते, तसंच काही शब्द मनाला प्रसन्न करतात तर काही शब्द मनात ताण निर्माण करतात.

डॉ. मसारू एमोटो यांनी पाण्यावर केलेल्या प्रयोगांत हे सिद्ध झालं आहे. प्रेम, शांती, कृतज्ञता अशा शब्दांनी पाण्याचे स्फटिक सुंदर झाले, तर राग, तिरस्कार अशा शब्दांनी विकृत आकार घेतला. यावरून शब्दांची ऊर्जा प्रत्यक्ष भौतिक जगावर परिणाम करते हे स्पष्ट होतं. दैनंदिन जीवनातील उपयोग

कुटुंबातील संवाद प्रेमळ ठेवल्यास नातेसंबंध दृढ होतात. म्हणूनच घरात अभद्र बोलू नये, कोणाचे वाईट चिंतने, शिव्या शाप देऊ नये, माहिती नसताना एखाद्या बद्दल दुसऱ्याला सांगू नये महापाप असते असे वडिलधारी मंडळी म्हणत असतील का! अशा कितीतरी गोष्टी बोलल्या जातात. आपल्याला वाटते याने काय फरक पडतो….

पण फरक पडतो…

शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी उत्साहवर्धक शब्द वापरल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढतो.

कार्यस्थळी सकारात्मक भाषेचा वापर केल्यास सहकार्याची भावना वाढते आणि तणाव कमी होतो.

शब्द ही केवळ ध्वनीमालिका नाही; ते ऊर्जेची बीजे आहेत. जसे बीज पेराल तसे झाड उगवेल. त्यामुळे आपण वापरत असलेले प्रत्येक शब्द, वाक्य आणि भावना याकडे सजगतेने पाहायला हवं.
जर आपण सतत प्रेम, कृतज्ञता, आशा, सत्य यासारखे शब्द वापरले, तर ते आपल्या जीवनात तशीच ऊर्जा आकर्षित करतील.

 

“या माझ्या चांगल्या शब्दांच्या एकत्रित येऊन तयार झालेल्या अर्थांच्या ध्वनीने  लोकांच्या आयुष्यात आनंद निर्माण होईल का! प्रकाश वाढेल का?”

ईश्वरशक्तीकडून असा शब्द प्रकाश मिळविण्याची शक्ती मिळो….

Varsha Karhad - Munde
Latest posts by Varsha Karhad - Munde (see all)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *