माहित आहे का !


तिला ओळखता का!

आता जरा कुठं मिळतंय स्वातंत्र्य चिमुटभर,
सत्ता मुठभर, अन् अधिकार घडाभर …

तरीहीआश्रित,शोषित,पिडीत,
जन्मापूर्वीच मरण मनात मात्र प्रश्न ढीगभर!

माहिती आहेत का ! खरं सांगा न् माहिती आहे का! आणि माहिती असेलच तर जाणीव आहे का!

दररोज एक पाऊल सोबत चालताना….
स्वतःला सिद्ध करताना एक पाऊल पुढे टाकताना…
पुरूषाच्या तुलनेत काय असतो स्त्रीचा नेमका नैसर्गिक प्रवास!

का फक्त ते घर, ती जात, तिचा दिनक्रम नाहीतर ती एक बाईमाणूस याच्या पुढेही स्त्री काहीतरी असते.

खरं सांगा ना माणूस म्हणून ओळखतात का तिला!

तिच्या हक्काच्या जमिनीविषयी थोडं सांगू शकाल का?
पिढ्यानपिढ्या शोधत असलेली तिचं हक्काचं घर ?
तरी लख्ख आहे बरं! दोन्ही घराचा कोपरानकोपरा तिच्या तळहाताच्या रेषांना पुसटसं करून…

मग त्या घराचा निश्चित पत्ता आणि घरातील तिची जागा…
मला जरा सांगू शकाल का?
शोधू शकाल का? तिथे तिच्या अस्तित्वाच्या काही खुणा?

आपल्याच कल्पनेत स्वतःला क्षणात स्थापित विस्थापित करत करत प्रस्थापित होते ती…
दिवसरात्र सगळ्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करताना..
कधी पाहिलंय का तिला?
क्षणभर स्वतःच्या विश्रामगृहात पहूडताना…

नात्यांच्या कुरूक्षेत्रात स्वतःशीच रोज लढताना..
अपमान,उपेक्षा, संघर्ष आणि हो तरीही निखळ हसून नाती जपताना…
कोणी पाहिलय का त्यावेळी धडपडताना !

शरीराच्या व्यतिरिक्त…
एका स्त्री मनाच्या अतिरिक्त?
मानलंय कधी व्यक्ती म्हणून?
कधी डोकावून पाहिलात तिच्या आतला व्यक्ती ? तिचं व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व…
ओलांडलंत का कधी तिच्या मौनाच्या उंबरठ्याच्या आतील शब्दांनी भरून वाहिलेलं तिचं माप?
मग त्याचं मोजमाप न करता केलीत ना शेवटी तुलना!
तुलना , स्पर्धा, परीक्षा,अन् कसोटी सारख्या परिस्थितीची असते ना!

शरीर,मन,आई, बाई! तो संसाराचा व्याप!
यासाठी स्वतःच्या समस्त जीवनाला तिचं सक्तीनं व्यापणं!
अगदी थोडक्यात तरी सांगू शकता का तुम्ही?

एका स्त्रीला बाई-माणसाच्या दृष्टीने समजणं अन् निर्लेप व्यक्ती म्हणून मान्यता देणं !
प्रत्यक्षात मात्र तिचं नेमकं जगणं आणि तुमचं तिच्यासोबतच वागणं!

यातील काहीतरी माहिती असेल ना!
जर नाही?
तर मग तुम्हाला काय माहिती आहे?
फक्त तिचं नटणं,मुरडणं , दिसणं,स्वयंपाकघर अन् शयनकक्षातलं वावरणं!

 

 

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

3 thoughts on “माहित आहे का !”