माझ्या साहित्य लेखनाच्या प्रेरणा….

 

खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई, अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेतील शिक्षक साहित्यिकांचे साहित्य संमेलन.
स्वानुभव कथन

विचार संघर्ष

वेदना- संवेदनेचे असंख्य अनुभव मला आले, जगले ती सहवेदना मला लिहायला प्रेरणा देते. जे आहे जसं आहे अगदी तसंच त्याचं भाषेत सत्यकथेत लिहावे ही प्रेरणा देखिल या वेदनेतून मिळते. अवहेलना, पोटासाठी संघर्ष, पराकोटीची सहनशीलता,ताकत असून अपमानास्पद वागणूकीत संयम,अस्तित्वाची धडपड,जगण्याची जिद्द, पाण्याने भरलेले डोळे, खाली मान घालून एकटक जमिनीकडे पाहणारी नजर,निरागस बालमनं शांत होताना, मरणासन्न अवस्थेत असलेल्या व्यक्ती, हाताबाहेरची हतबलता, जन्मभराची विवंचना,अगदी वादळात घर मोडून सुद्धा जिद्दीने काड्या जमा करणारे पक्षी.....यासारख्या अनेक संवेदना जास्त सुंदर बोलतात. यासाठी कोणत्याही अलंकारिक शब्दांच्या सामर्थ्याची, माल मसाल्याची फोडणी इथे नको वाटते. अनुभव, प्रसंग जसेच्या तसे लेखनाच्या माध्यमातून, काही तरी सकारात्मक घडण्यासाठी अनेका पर्यंत पोहोचवावे, खोलवर रुजवावीत आणि कित्येक पटीने पुन्हा उगवावीत असा विचार मी करते. हा विचारसंघर्ष मला स्वस्थ बसू देत नाही. ही अस्वस्थता देखील मला लिहायला प्रेरणा देते तसेच भावनेला वाट मोकळी करून देते.

प्रभावित भाव

भाव बदलला न् की सगळे बदलते. जसं कधी उन्हाची झळ लागते, तर कधी एखादी मंद थंडगार झुळूक येते, गारवा पसरतो... तसे बालपण, गावाकडील परिसर, शिवार, पाऊस आठवतो. आनंद, प्रसन्नता, समाधान देतो. अशा अनेक गोष्टी जीवन जगत असताना प्रभावित करत असतात. या प्रभावित भावना लेखनासाठी प्रेरणा देत असतात. शब्दातून उमटण्यासाठी एखाद्या झुळके सरशी काव्यरचना मनातून बाहेर येतात. कविता कागदावर उतरली जाते. ओघवती रचना तयार होते. एकांतात असताना काही क्षण या रचनांची निर्मिती होते. जी भावना निर्माण होते तोच भाव लेखनातून उमटतो. हे लिहलेले कुठल्या गटात, कुठल्या प्रकारात, कोणती विचारसरणी, प्रमाणभाषा की बोलीभाषा, सणसणीत की गुळगुळीत असला कोणता विचार मी करत नाही. त्या फंद्यात अडकत नाही. जे आहे ते असं आहे आणि मला ते तसंच लिहायचा आहे, लिहावे लागणार आहे! तरच लेखनी प्रांजळपणे, मुक्तपणे विविध भाव प्रदेशात विहार करू शकेल. हाच विचार कायम माझ्या मनात असतो. शेवटी कोणी लिहिले यापेक्षा काय लिहिले हेच कायम टिकतं. जे भावते ते लवकर पोहोचते.

ग्रामीण जीवनानुभव, बोलीभाषा

ही लेखनाची प्रेरणा माझ्यापर्यंत कशी पोहोचली, रुजली? मला लिहीतं कोण ठेवतं? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी  मी माझ्या बालपणात प्रवेश करते. माझी आजी, आत्या, शाळेत न जाणाऱ्या बालमैत्रिणी यांच्या सहवासात खेड्यात दीर्घकाळ राहण्याचे भाग्य लाभले. त्यांची भाषा, कामं, माया, हातची चव त्या म्हणत असलेल्या ठराविक लईतील त्यांच्या स्वरचित ओव्या, गाणी, गीतं यांमधून अस्सल ग्रामीण जीवन जाणिवा मला मिळाल्या. मी तेव्हाही त्यांच्या गाण्यातील, शब्दांचे अर्थ शोधायचे. या सगळ्यांची आठवण झाली की आजीचा सुरकुतलेला हात मायेने गालावरून, पाठीवरून फिरत आहे असा आजही भास होतो. मन पुन्हा त्या खेड्यात, वाड्यात, पार आतल्या देवळीतल्या देवाला दंडवत घालण्यासाठी त्या थंडगार, पुसटशा उजेडातील लादनीत प्रवेश करते. अन् आपसूक कविता तयार होते.

*बाय माझी सुगरणं,सुगरण साताची*
*घरीदारी, रानीवनी, कष्ट तिच्या हाताची*
*गार पाण्यानं गं वली, सारवते भुईसरं*
*चोपडं गं अंगण, सारा परवारं*
*घोंगडी नेटकीचं, बाजेवर गोधडी*
*यळ झुंजरूकाची,कामं रामापाराची।।१।।*

या कवितेत मी शुद्ध शब्द वापरले तर तो गोडवा, ग्रामीण जीवन मी दर्शवू शकत नाही. जिथले जीवन तिथल्याच भाषेत लेखन.... हे आपसूकच घडत असते. इथं माझ्या मराठवाडी बोलीभाषेला पर्याय नाही.
*रुतला पायी काटा निघता निघना*
*गावकूस याद सये जाता जाईना।।धृ।।*
साधे, सोपे, नेहमीचे शब्द वापरून समर्पक मांडणी, गोडवा निर्विवादपणे काळजापर्यंत नेण्याचे सामर्थ्य, प्रेरणा, मला बोलीभाषेचे अस्सल सौंदर्य आणि ग्रामीण जीवनातील स्वानुभव देतात.
आत्मविश्वास
काही मूळ प्रेरणा सर्वांच्या सारख्याच असतात. जसे वैयक्तिक भावभावना, नाते, समाज, व्यक्ती, समस्या, आनंद.... यासारख्या अगदी सामान्यातल्या सामान्य गोष्टी देखील विशेषातील विशेष लेखनाची प्रेरणा होऊ शकते. प्रेरणेसाठी फरक पडतो तो अनुभवांची तीव्रता, संवेदनशीलता, धारणा, प्रतिभाशक्ती, आकलनक्षमता, नेमकेपणा, उद्दिष्ट, जीवन अनुभव समजून घेऊन भावविश्व उलगडण्याचे सामर्थ्य यावरून प्रेरणेला दिशा मिळते. म्हणूनच सर्वांनी एकाच पद्धतीने लिहिलेले नसते. असेच! तसेच! लिहिले पाहिजे वगैरे म्हणजे मूळ अभिव्यक्ती प्रेरणेला छेद करण्यासारखे असते. जोरदार विषय आहे, आकर्षक आहे, सर्वमान्य होईल म्हणून हेचं लिहिले पाहिजे, यापेक्षा मला रंगरंगोटीच्या आतले चेहरे जास्त खुणावतात, स्पष्ट दिसतात. व्यक्तीपेक्षा क्षण सत्याचा वाटतो. भावनेचे मूळ नैसर्गिक आधार.... महत्वाची वाटतात. म्हणून मला लेखनासाठी कोणताच विषय निषिद्ध नाही. असा स्वतःबद्दल आत्मविश्वास आहे. हा आत्मविश्वास मला विविध विषयांना थेट हात घालून, स्पष्टपणे लिहायला प्रेरणा देतो. शेवटी लेखन चांगले असले की रद्दीचा कागद सुद्धा आवडीने वाचला जातो.
हा आत्मविश्वास कुठून आला?
सुरूवातीला मलाही माझ्या भाषेबद्दल संकोच वाटायचा. माझ्या लेखनाला हसतील का? काहीतरीच लिहिलं आहे!! मुळात असं वाटायचं मला लिहिता येते का? आता घरातले, जवळचे चांगलंच म्हणणार ना!! असं बरंच काही वाटायचं!!
पण आता असं काही वाटत नाही!
हे केवळ कोणाच्या तरी प्रेरणेमुळेच शक्य आहे. लिहित असताना आपल्याला नेमकं काय थांबवत?अडवतं! तर! आपली प्रतिमा! सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग!

सुरवातीला....
या माझ्या साइटवरून पब्लिश केलेली अनेक  ब्लॉग मीच हटवली. डिलीट केली. पण तोपर्यंत बर्‍याच जणांची वाचून झाली होती. अनोळखी व्यक्तींनी आपल्या लेखनाबद्दल केलेले समीक्षण तटस्थ असते. एका इंजिनिअरिंग कॉलेजमधील प्रोफेसरची प्रतिक्रिया माझ्यापर्यंत आली. ताई ,"इमोशनल इंटलेक्च्युअल रायटिंग स्किल आहे."...
एक संदेश आला. "बापरे! कोण आहेत या मुंडे बाई!  त्यांनी काय लिहिलं हे सगळं समजलं. काय भाषा आहे! पैठणीच्या आणि दागिन्यांमध्ये जुनी गृहिणी जशी दिसते तसे वाटले.* अशा पद्धतीच्या अनेक अनोळखी लोकांचे अभिप्राय आणि प्रतिसाद तसेच शंका, प्रश्न देखिल महाराष्ट्रातून आले.  साईटच्या माध्यमातून आज माझे लेखन शेकडो- जणांपर्यंत पोहोचले आहे. भविष्यात त्यात आणखी साहित्यिक दालनं उघडण्याचा  मानस आहे. या माझ्या लेखनाला साईट आणि पुस्तकांच्या रूपाने *निश्चित स्वरूप, मान्यता, दिशा* मागच्या केवळ तीन वर्षापासून देण्याचा मी प्रयत्न करत आहे. अजूनही मी या क्षेत्रात नवखी आहे. या तीन, चार वर्षाच्या आधी काय होतं? जे माझी प्रेरणा टिकवून ठेवत होतं!
दैनंदिनी/ डायरी
मी माझ्या दैनंदिनी/ डायरीमधून पुन्हा एकदा मागचा प्रवास करते. मी त्यावेळी लिहिलेले अंतिम नसेल. त्या त्या वळणावर समोर आलेले क्षण असतील. चूक किंवा बरोबर पेक्षा जीवनाला विस्तारित जाण्याचे टप्पे असतील. या संग्रहीत डायरींमध्ये दरवर्षी वेगळा विषय घेऊन एक पुस्तक तयार होईल एवढे साहित्य तयार आहे. कॉलेजला असल्यापासून या दैनंदिनी लिहायच्या सवयीने दिवसभरातील अनावश्यक घटनाक्रमाचे दीर्घ उताऱ्या पासून ते चिंतनाच्या नेमक्या चार ते पाच ओळी लिहिण्याचे कौशल्य देखिल मला प्राप्त करून दिले.
वाचन
वडिलांनी वाचनाची गोडी निर्माण केली. या वाचनात अगदी योजना, लोकराज्य ही मासिक देखिल होती... वाचनासाठी सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध होते. अभ्यासाची पुस्तके सोडून वाचले तरी आणि हेच वाचले पाहिजे असं बंधनही नव्हतं. समोर दिसले, मिळाले ते वाचले. वाचलेल्या अनेक भारतीय विचारवंत, पाश्चिमात्य विचारवंत, धर्मग्रंथ, नाटक, कथा, कादंबऱ्या, कविता, ऐकलेली मराठी, हिंदी, इंग्रजी, ऊर्दू, सुफी गाणी यांचे विस्तारित अर्थ काय असतील? लेखक, कविमनाचा शोध घेत घेत नेमके काय म्हणायचे आहे? तिथे पोहोचण्याचा प्रयत्न देखील मला आनंद देतो. हा आनंद देखील माझ्या लेखनाची प्रेरणा आणि ऊर्जा आहे.
निसर्ग

जसा गावाकडील निसर्ग आवडतो..तसे विविध पर्यटन स्थळातील वेगळेपण मनात भरते. या निसर्गमायेतून निसर्गाविषयी लिहायला प्रेरणा मिळते. मानवी जीवन आणि निसर्गाचे स्वरूप एकरूप आहे या जाणिवेतून केवळ अनुभवांचे वर्णन नाही तर *अनुभूतीचे दर्शनही* लिखाणातून यावे यासाठी प्रेरणा मिळते.
प्रत्येक ठिकाणचा सूर्योदय-सूर्यास्त वेगळ्या सौंदर्याने नटलेला असतो. पर्वत समुद्रकिनारेही वेगळे... शांत निवांत क्षण अनुभूती लिहीण्यासाठी प्रेरणा देतात मन आपोआपच अध्यात्मिक दिशेने वाटचाल करते. मनाची एकाग्रता झाली की नंतर हा अनुभव शब्दात मांडण्यासाठी शब्दांची धडपड, गोंधळ सुरू होतो. गर्दी करतात. विविध आकर्षक, सुंदर, अर्थभरीत वर्णन करण्यासाठी आता मात्र अलंकारिक शब्द आवाज द्यायला लागतात. हे सगळे मांडण्याचा प्रयत्न देखील सर्वोच्च आनंद निर्माण करतो. आपल्या एखाद्या कृतीतून आपल्यालाच आनंद मिळायला लागला की ते काम स्वप्रेरणा बनते. मग आपोआप वेळेचे नियोजन होते. निश्चित स्वरूप येते. प्रयत्न केले जातात. प्रयत्नांची तीव्रता आणखी वाढते.

शाळा, संस्था

21 वर्षातील माझ्या शाळेतील विद्यार्थी, पालक यांच्याशी केलेला संवाद.  एखादा विषय ठरवून घ्यायचा. पण न ठरवल्या सारखा सहजपणे संवाद करायचा. यामुळे अनेक गोष्टी उलगडल्या, विद्यार्थ्यांच्या  समस्यांच्या मूळापर्यंत जाता आले. नेमक्या गोष्टी कळायला लागल्या. शिक्षक म्हणून काम करत असताना छोट्या विद्यार्थ्यांशी होणारा निरागस, निखळ, आनंदी, निर्लेप सुसंवाद माझे बालविश्व लेखनाचे, प्रेरणेचे ऊर्जास्त्रोत्आहे.
शाळेतील दैनंदिन अनुभव, संस्थेतील प्रासंगिक व्याख्यान, मार्गदर्शन कार्यक्रम, उपक्रमाच्या निमित्ताने भाषण, गोष्टी यांची केली जाणारी तयारी, संस्थेच्या माध्यमातून बाहेरील विविध अतिथींचे मार्गदर्शन, कार्यशाळा, प्रशिक्षण या सगळ्यांच्या नोंदी, सूक्ष्म निरीक्षण, उपयुक्तता, तुलना, दिशा दर्शनाचे अवलोकन, जोडीला सहभाग यासारख्या अनेक गोष्टी एकत्र आल्या की नकळत प्रेरणा मिळत असते. मला असा विश्वास आहे सलग 10 वर्षे  शाळेतील सगळे विभाग मन लावून सांभाळून झाले की प्रत्येक शिक्षक लिहू शकतो!!... मलासुद्धा असचं शिकायला मिळाले.

मुळात आत्माविष्कार होणे

ही कोणत्याही कलेची पहिली आणि शेवटची प्रेरणा असते. आत्मविष्कारापर्यंत जाण्याचा प्रवास घडला पाहिजे. स्वतःहून प्रयत्न देखिल केला पाहिजे. प्रत्येकाला रुचणारं असं काहीतरी असतंच की फक्त प्रकार बदल असतो.
मग लिहावंच असं का वाटतं? स्वतःचे विचार सांगण्यासाठी? अनुभव संग्रहित करण्यासाठी? स्वतःचा परिचय लेखक, कवी, साहित्यिक व्हावा म्हणून? की कौतुक मार्गदर्शनासाठी? नाही यापैकी एकही नाही हे सगळे बायप्रॉडक्ट असतात. मला स्वतःला असं स्पष्टपणे वाटतं की आता मी लिहलं पाहिजे! असे वाटेपर्यंतचे अनुभव गाठीशी जमा झाले अन् ठरवले आता मी निश्चित स्वरूप द्यायला सुरू करू... केवळ आणि केवळ अभिव्यक्तीसाठी.

लिहिणाऱ्याला निसर्ग हट्ट करतो तुझ्या नि माझ्या उत्सवात लेखणीला सहभागी कर. स्वतः सहीत अनेकांचे अश्रूं वाहून लेखणीच्या शाईत उतरत असतात. हास्याचा खळखळाट लेखणीला हास्य लकेर उमटुन हसवायला लावतो. टाळ्यांचा कडकडाट कधीकधी कानउघडणी करतो. जे आहे तेच लिहिलंय ना एकदा तपासून घे!! माझे तेच सगळ्यांचे या जाणीवेतून वेदना लेखणीला सांगते दुःखाची तीव्रता कमी कर. त्या भावनेच्या मुळाशी जाऊन मनातील खोल आवर्तनं मांडल्याशिवाय विस्तार होत नाही. या प्रेरणेतूनच वाचणाऱ्याला त्या अनुभवापर्यंत घेऊन जाण्याचा माझा प्रयत्न असतो. लिहिण्याचा मोह, इच्छा, छंद, मान्यतेपेक्षा ते भावनेच्या कोणत्या पातळीपर्यंत घेऊन जाईल हे महत्त्वाचे वाटते. भावनांची कधी स्पर्धा असत नाही. प्रत्येकाच्या जाणिवेची पातळी वेगळी असते म्हणून प्रत्येकाची लेखणी स्वयंभू असते. अर्थापर्यंत पोहोचलेल्या वाचकांचा आशीर्वाद तिला लाभत असतो. हा आशीर्वाद पुढील लेखनाची प्रेरणा बनत असतो.

अभिमित्र
लेखनी कायम सोबत, समजून घेत घेत सर्वांना समजावून घेणारी असते. ती आत्मविश्वासपूर्वक नवनवीन भाव प्रदेशात फिरतांना अर्थपूर्ण रचना समृद्ध करणारी सकारात्मक प्रेरक अभिमित्र असते. कोणतेही काम करताना आपल्याला नेमकं काय हवय!! हे माहिती असले की मग फापटंपसारा आपोआप कमी होतो. आपली कृती इतरांसाठी प्रेरणा बनते. सवंगप्रसिद्धी पेक्षा प्रत्येक क्षेत्रासाठी सिद्ध होणे महत्त्वाचे वाटते.कोणतीही व्यक्ती बंजर नसते तिच्यात काहीतरी नवनिर्मितीची क्षमता असते. पुस्तकात सगळं जीवन जरी असले तरी जे नाही ते कोणाच्या तरी अनुभवात असणार! शोध लागेपर्यंत शोध कशाचा!! हे माहिती होत नाही...
माझ्यापेक्षा साहित्यिकदृष्ट्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती हजारो आहेत मला माहिती आहे.. माझे, तुमचे, आपले अनुभव आपल्या लेखणीतून इतरांच्या प्रेरणेची शिदोरी व्हावी या अपेक्षेसह सर्वांनी माझ्या लेखनाची प्रेरणा समजून घेतली असेल अशी आशा ठेवून थांबते.

Varsha Karhad - Munde
Latest posts by Varsha Karhad - Munde (see all)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

3 thoughts on “माझ्या साहित्य लेखनाच्या प्रेरणा….”