या जगण्यावर शतदा असही प्रेम करावं…

या जगण्यावर शतदा असही प्रेम करावं…अवघड कठीण असं माणसात काहीच नसतं ! शेवटी आपण माणसचं कोणी खरचं चुकणारं असतं….कोणी मुद्दाम चुकवणारं असतं…उगी नकळत मनाला मात्र चुकचुकल्यासारखं वाटंत रहातं.. कधी कोणी समजावल्यासारखं करतं… कुणी समजून घेतल्यासारखे करतं.. सगळं समजून उमजून कोणी शांत रहातं…कधी माणसं सहभागी करायला कुणाकडे जागा नसते ….कधी जागा असून माणसं नसतात… कधी माणसं असुनही जागा रिकामीच रहाते….कधी गर्दीतही एकटेच असतो..कुठे एकट्याचाही गर्दा असतो.. कुठे एकांत हवाहवासा असतो… कधी खोटं खरं वाटतं..कधी खरं खोटं वाटतं..कधी खरखोटं याबद्दल कोणाला काय वाटतं?

कधी काही शब्द ऐकायचे असतात ऐकू येत नाहीत.. कधी मनाचं बोलणं चेहऱ्यावरून समजतं…कधी काही ऐकावेसे वाटतं नाही तरी कानावर आदळतं…. कधी कोणी अपमान करते….तर कधी कोणाला मान दिला तर समजतं नाही.. मानापमानाच्या थोडं पुढेही माणूस असतो हेच का कळत नाही…. कोणी खर्या जगण्यात नाटक करतं….कोणी नाटकात खरं जगतं..मुखवटे बाजूला केले की खरं स्वरूप कळतं… कोणाची वेळ येते…कोणावर वेळ येते…कधी काळ वेळ साधून घेतो..
शेवटी माणसांकडून माणसांसारखेच अनुभव येतात..
माणसाकडून माणसासारखे अनुभव का येत नाहीत?
कधी कोण काय समजेल याचा अंदाज नाही….कधी कोठे कोणाला काय उमजेल याचा नेम नाही… तुमचं आमचं सेम नाही… कारण जाणिवानेणिवा एक नाही…. खुशाल समजू द्यावं… अश्या असंख्य भावना, व्यक्ती, आयुष्य… जगणं…जीवन आणि!.. आणि!…
आपण स्वतः
आपण आपलं उगी नदी सारखं जगावं… वहातं रहावं… सकारात्मक प्रवाहीपण जपत जपत…
इच्छा असुनही नदीला थांबता येत नाही… कारण साचून बसलं की कुणालाच काही उपयोग नसतो
कितीही खडकाळ जमीन आली तरीही नदीच्या प्रवाह आपला मार्ग काढतो. सगळं नकारात्मक, वाईट काठाला लावून वहात रहावं… नको असेल तर वळसा घालून वहावं… हवं असेल जरा पसरून घ्यावं… थांबवलं तरी साचू नये… पुन्हा उमेदीने उसळूनही वहावं… कोणी निर्माल्य टाकेल…कोणी काही करेल..आपण मात्र आजूबाजूला चांगलं पेरलेलं उगवत, फुलवित, बहरत जावं…
सगळ्यांसाठी उपयुक्त होत फक्त वहात रहावं… तेही किनाऱ्यावरची मर्यादा न सोडता…. हाच गुणधर्म नदीला श्रेष्ठ बनवतो नाहीतर मग मर्यादा सोडून वहायला लागलं तर किनाऱ्यासकट उद्ध्वस्त! शिवाय पाणी गढूळ … या जन्मावर या जगण्यावर शतदा असही प्रेम करावं .. फार काही नाही पण नदीसारखं थोडं तरी वहाता यावं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

One thought on “या जगण्यावर शतदा असही प्रेम करावं…”