देवाला केवळ तत्वज्ञानाने नाही तर भावनेने समजणारा जो असेल तोच ईश्वराला प्राप्त होऊ शकेल. जो आपल्या बुद्धीवर नियंत्रण ठेवू शकतो, ज्याला तर्कशुद्ध विचार करता येतो, त्याला विज्ञानवान म्हणतात. तो कशाचाही दास नसतो म्हणजे विवेकवान असतो. हा विवेक केवळ बुद्धीचा नाही तर पंचकोश विवेक आहे. अन्नमयकोष, प्राणमयकोष, मनोमयकोष, विज्ञानमयकोश व आनंदमयकोश.
देह वाईट आहे. हलका आहे. त्याज्य आहे म्हणून जर कोणी या दृष्टीने विचार करून या ध्यानाच्या वाटेवर पुढे जात असेल तर ईश्वराच्या कलाकृतीला निंद्य मानण्यासारखे आहे. आपण कसं काय? नींद्य मानू शकतो! कारण अशी व्यक्ती अन्नमय कोशाच्या पलीकडे कशी काय जाऊ शकेल! देह याचे साधन आहे साध्य नाही एवढेच!
हे समजून देहाच्या साधनाद्वारे साध्य करतो तोच अन्नमय कोशाच्या पलीकडे पोहोचू शकतो. ईश्वर कोणत्याही रूपाने भेटायला यावा हे ज्याचं ध्येय बनलं आहे; त्याच्या करता तो देहाचा उपयोग करतोच की! अशा ध्येयाचा अधिकारी कोण? विज्ञानवान कोण? या दोन्ही ध्येया करता जो देह वापरतो तोच!
फुल समोर आहे, दुसरे आहे त्याचा आनंद मात्र आपल्या मनाला होतो आहे. डोळ्याने पाहून आणि नाकाने वास घेऊन मनापर्यंत आनंद भावना पोहोचवण्यासाठी जसे फुल किंवा तत्सम गोष्ट डोळे आणि नाक ही साधने आहेत त्याच्या माध्यमातून आपण या आनंदाचा अनुभव घेतो. हा आनंद मनालाही होतो कारण मन सहजभावाने यामध्ये सहभागी होते. असेच प्रार्थनेच्या माध्यमातूनही हा आनंद आपल्यालाच होतो.
ईश्वराचे प्रतीक म्हणून मूर्ती स्वीकारतो आणि त्यात तो भाव ओततो म्हणून मुर्तीतही देव दिसतो. तसेच आपण जसे आहोत तसे स्वीकारून आपल्या भावांना ईश्वराप्रतीच्या भावांना उच्चतम घेऊन जाणे म्हणजे प्रार्थनेने सुरुवात करणे. आपल्या भारतातील भारतीय तत्त्वज्ञान हा केवळ बुद्धीचा विलास नाही.
जो प्राणांची पर्वा करत नाही, मनाच्या ताब्यात जात नाही, बुद्धीवर नियंत्रण ठेवू शकतो तोच तर्क शुद्ध विचार करून या कायमस्वरूपी शांती ध्यानाकडे वाटचाल करू शकतो.
यस्तु अविज्ञानवान भवति अमनस्कः।
म्हणून अविज्ञानवान माणूस मन जिकडे नेईल तिकडे जातो. मनासारखे भरकटत जातो. अशी व्यक्ती प्रकांड पंडित असली तरी त्याचे बुद्धीचे निर्णय कोणाच्या उपयोगाचे ठरत नाहीत म्हणून तो अमनस्क होतो भरकटत जातो.
म्हणून बुद्धी, मन, शरीर, ऊर्जा यांनाही प्रार्थनेत सामावून घेता आले पाहिजे.
विमानस्क तर याही पुढचे कायम गोंधळ, द्विधा मनस्थिती आणि मनात द्वंद्व असणारे… प्रार्थना करतो ती नेमकी कशासाठी हे माहिती नाही.. पण असे लोक कायम ईश्वराची भीती बाळगून असतात. पूजेमध्ये थोडंही त्यांना काडी इकडे झालेली जमत नाही. सोपस्कार जास्त महत्त्वाचे वाटू लागतात. माझं काही चुकले तर देव मला सोडेल का? शिक्षा देईल! असं केलं तर परिणाम काय होईल? तसं केलं तर परिणाम काय होईल? शंका कुशंका गोंधळलेल्या मनामध्य कायम असणारचं!
अशी जास्तीची हुशारी केली की बुद्धी मनाला नियंत्रणात ठेवून निष्ठूर बनवते.
याउलट सर्वांना मृदू, प्रेमळ, सोज्वळ, भक्तीपुर्ण, हृदयस्थ, लवचिक, नम्र, क्षमाशील, करुणामय, पश्चाताप जाणीव, त्याग, समर्पण इथपासून ते दृढनिश्चयी, कठोरनिर्णयी, तपस्या, साधना कणखर, सहनशील प्रतिकारक्षम बनवून शांतीस्वरूप मनाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न प्रार्थनेतून होतो. हीच खर्या प्रार्थनेची ओळख आहे.
स्वच्छ, लख्ख आरशासारखं आपल्याला बनवण्याचा प्रयत्न आपलीच प्रार्थना करते. आपण करत असलेली प्रार्थना देवापेक्षा आपल्याला बदलवून टाकते हे सर्वांना माहिती आहे. ईश्वराला बदलवण्याची, दया ,माया करण्याची काय गरज! त्याच्यात बदल होण्याची आवश्यकताच नाही! तो प्रेमळ, दयाळू, मायाळूच आहे. अगदी कोणतीही अपेक्षा न ठेवता तो आपल्यावर प्रेम करतो मग प्रार्थनेतून स्वतःला आपण हलक करत असतो. जसे आहोत तसे स्वीकारत त्याच्यात विरघळून जायला हवं! ईश्वरामध्ये विरघळायचे म्हणजे काय! तर तो, आपण, सगळे एकच आहोत हा भाव निर्माण करायचा. त्याची भीती न ठेवता तो सोबत आहे हा विश्वास आपल्यात निर्माण झाला पाहिजे. मग कशाचीच चिंता राहत नाही. समोर जे येईल जसं येईल तसं आपण स्वीकारत जातो. आपल्यामध्ये सहभागी करत जातो. आपोआप यातून चांगलं घडणार असतं, कारण तो आपल्यासोबत आहे असा दृढ विश्वास निर्माण झालेला असतो. मग वाईट कसं काय घडू शकेल?
तो फक्त देत राहतो. मग असं निश्चित, निश्चिंत प्रेम मिळवण्यासाठी याचना, क्षमा, विनंती, इच्छा, प्रार्थना, साधना, आर्जव आपणच केलं पाहिजे. कोणत्या पद्धतीने केली? कशी केली? किती प्रमाणात? कोणाची उत्तम? अशा प्रश्नांना अर्थ राहत नाही.
नाहीतर प्रार्थना करतात परंतु केवळ पोपटाची बडबड या प्रवासात पायऱ्या असतात. असे लोक पहिल्या पायरीवर सुद्धा येऊ शकत नाहीत. पुढच्या पायऱ्या चढणं कठीण! महाकठीण!
बालवाडीच्या मुलाने पीएचडीची परीक्षा देण्यासारखे आहे!
ईश्वराच्या प्रेमाचा वर्षाव करून घेणं आणखी कठीण! आपल्या पूर्वजांसारखे बुद्धीवादी लोक अवघ्या विश्वात झालेले नाहीत. जो भेटेल त्याच्या पड पाया! घे हातात हात! लाव गळ्याला गळा! असं कधीच सांगितलं नाही…
सर्वप्रथम स्वतःचे दोन्ही हात जोडा आणि नमस्कार करा! प्रार्थना म्हणत म्हणत… स्वतःभोवती फिरा! मग ईश्वराच्या चरणी नतमस्तक व्हा! मग उत्तम व्यक्तींच्या, योग्य ज्येष्ठ व्यक्तींच्या पाया पडा! केवळ व्यवहार म्हणून प्रार्थना, हात जोडणी, पाया पडणे होत असेल तर काहीच उपयोग नाही. एखाद्याच्या पाया पडत असताना त्याच्याबद्दल आपल्या मनात कोणतातरी भाव असला पाहिजे आणि समोरच्यामध्ये सुद्धा आशीर्वाद देत असताना तो भाव निर्माण झाला पाहिजे तर त्या प्रार्थनेला, त्या पाया पडण्याला अर्थ असतो, नतमस्तक होण्याला अर्थ असतो.
काहीतरी मिळवण्यासाठी, स्वार्थासाठी, कीर्ती मिळावी, वेळ घालवण्यासाठी, ऐकायला छान वाटते म्हणून किती सुंदर प्रार्थना झाली अशा प्रकारची प्रार्थना स्वतः सहित इतरांनाही शून्य परिणाम देते. अंतकरणातून सहजभावाने केलेली प्रार्थना आपल्यामध्ये कारुण्य भाव निर्माण करते असा भाव निर्माण झाला की ईश्वर आपल्याला सूर्यासारखा भासतो. म्हणजे कसा? तर मनाच्या कोपऱ्यातल्या अंधार सुद्धा नाहीसा होतो. खरे तर प्रार्थना कोणत्या हेतूने जर केली, आपल्या जीवनातील अंधार दाखवण्याचा ईश्वराला प्रयत्न केला आणि जर तो सूर्यासारखा असेल तर ईश्वराला आपल्या जीवनातील अंधार आपण कसा दाखवू शकणार?? दाखवू शकत नाहीत! कारण जसं सूर्याला आपण म्हणालो,” चल तुला माझ्या घरातील अंधार दाखवतो! तिथे कायमच अंधार आहे. माझ्या मदतीला धावून ये! अरेरे! तो पाहायला जरी आला तरी उजेड होणारच आहे! कारण सूर्य जिथे जाईल तिथे उजेड होणार असतो. तो म्हणजेच उजेड आहे मग त्याला अंधार कसा पाहता येईल?? येणार नाही
आणि जे ईश्वराला दिसू शकत नाही, त्याला पाहायची इच्छा नाही ते आपण त्याला कसे दाखवणार!! ईश्वरापेक्षा आपण काही ग्रेट नाहीत म्हणून वैयक्तिक सुखदुःखासाठी, अडीअडचणीसाठी, आपल्यातल्या नाटकी अंधारासाठी ईश्वर येत नाही. कारण तो सूर्य आहे, तो म्हणजेच उजेड आहे.
आपली सहजभावाची प्रार्थना मात्र आपल्यावर या ईश्वराची प्रकाशकिरणे पाडून न्हाऊन घेऊ शकतो. भरभरून ऊर्जा घेऊ शकतो. प्रार्थनेने मिळालेली ईश्वराची ऊर्जा आहे. हा अनुभव आपल्याला होत जातो. तो आत्मशक्ती देतो. आपल्यावर पडलेली प्रकाशित किरणे आपोआप आपल्यातून प्रवाहित होतात. आपल्यामध्ये, आपल्या भोवती, आजूबाजूला प्रकाशमय करत जातात. जसे अवकाशात अनंतकण फिरत आहेत तसा आनंदाचा अनुभव येतो. आपले मन स्थिर व्हायला सुरुवात होते. सकारात्मकता वाढते.
जो अश्या भावनेने भजन म्हणतो,तल्लीन होतो,ज्याचे देवासमोर त्याच्या ओढीने आपोआप डोळे भरून येतात, विनंती, एखाद्याच्या वेदनेची कळ जश्यास तशी लागते, प्रकर्षणाने याचना होते, त्याच्या गुणांची असिमीत स्तुती गायली जाते, उपकाराची कृतज्ञता व्यक्त होते, कुठेही स्मरणासाठी तंद्री लागते, पश्चातापाचे निवेदन निखळ मनाने साधल्या जाते, हक्काने अर्ज, आळवणी, मागणी केली जाते यात कोणताही नाटकीपणा नसतो. यासाठी कोणी निंदा केली तरी कोणाचाही राग येत नाही. कारण त्यांची तेवढीच समज आहे असा भाव निर्माण होतो आणि आपण ईश्वरचरणी समर्पित भावाने नतमस्तक होतो. हीच खरी प्रार्थना अशी प्रार्थना कोणीही केली तरी ईश्वर कोणत्या ना कोणत्या रूपात धावत येतो.
अशांवरच भगवंताची कृपादृष्टी, कारण्यदृष्टी असते. असा व्यक्ती एकटा असला तरी त्यात एकटेपणा नसतो. त्याला ईश्वराने स्वतःमध्ये आणि त्याने ईश्वराला स्वतः मध्ये सामावून घेतलेले असते. स्वतःला सिद्ध करत करत भगवंताकडे जाणाऱ्या पुढच्या पायऱ्या चढत असतो. अंतकरणात सहजभाव निर्माण होण्यासाठी श्रद्धायुक्त मन लागते. प्रार्थनेमध्ये प्रचंड ताकत आहे. मात्र आपल्याला, स्वतःला बदलण्यासाठीची! ऋषीमुनींनी, साधुसंतानी मंत्र, स्त्रोत,अभंग प्रार्थना यातून शाश्वत जीवनाच्या आधाराचा परमानंद अनुभवला आणि आपल्यासाठी ठेवा ठेवून दिला आहे. प्रार्थना म्हणजे ईश्वराची ओढ आणि ईश्वराची वाट पहाणे! त्याचे स्मरण करणे, कोणत्याही प्रकारे तोंडातून उच्चार न करता पूर्णपणे समर्पित भावनेने केलेली प्रार्थना सर्वोच्च असते. आपण खरी प्रार्थना करतोय आपल्यात बदल होते हे आपल्यालाच ओळखता येते.
तो वर नाही तर आपल्या अवतीभवती आहे हीच भावना प्रार्थना निर्माण होते. त्याच्या प्रतिकांजवळ, ठिकाणी केलेली प्रार्थना अद्भुत वातावरण निर्मिती होऊन हा भाव जास्त निर्माण करते.
संतांच्या प्रार्थनेत नम्रता असते म्हणून संत सांगतात की भक्ती शक्तीला मिळते. आपण माणसे केवळ काहीतरी आवश्यक असते म्हणून म्हणतो की प्रार्थनेने काहीतरी मिळवतो. अध्यात्म सांगते स्वाभाविक शांती मिळते. पण या सगळ्यांमध्ये आस्था, विश्वास, आणि श्रद्धा असावी लागते. प्रार्थनेमुळे आपण स्वतःला ईश्वराच्या इच्छेनुरूप बदलत जातो. जसं आपण म्हणतो लहान बाळांमध्ये ईश्वरतत्व जास्त असते त्याचं कारण आहे आपण कपडे कोणते घातले आहेत? खायला काय दिले आहे? आपल्या घरात काय आहे? कोणाच्या मनात काय चालले आहे? असे आपल्यासारखे अनंत अनावश्यक प्रश्न त्याला पडत नाहीत त्याला जगण्यासाठी फक्त प्रेम आवश्यक असते. आणि या प्रेमापोटी आई जे करेल ते त्याच्यासाठी एकमेव अद्वितीय,प्रिय असे असते. त्याच्यासाठी तेच जीवन असते. आणि ईश्वर आईच्या रूपाने आईमध्ये, एखाद्या स्त्रीमध्ये, पुरूषामध्येही मातृभाव निर्माण करून ईश्वर त्याच्यापर्यंत पोहोचलेला असतो. तशाच प्रेमाची अपेक्षा ठेवून आपण ईश्वराची प्रार्थना करावी. ज्यामध्ये आपल्याला फक्त ईश्वराचे प्रेम आपल्यावर आहे ही अनुभूती होत जाते. आपल्याला, आपल्यासाठी तेवढेच बास आहे.
कौरवांच्या भर सभेत वस्त्रहरणाच्या वेळी केलेली द्रौपदीची याचना…
भक्त प्रल्हादाने पराकोटीच्या विरोध प्रसंगी शांत चित्ताने केलेले भगवंताचे स्मरण…
कान्होपात्रेने विठ्ठलाच्या पायावर अश्रूंच्या धारेतून ठेवलेला पश्चाताप….
रावण अपशब्द वापरताना डोळे मिटवून श्रीरामांचे सीतेने केलेले स्मरण….
ज्ञानेश्वरांनी विश्वाच्या कल्याणासाठी केलेली आर्जव… एखाद्या वृद्धाश्रमात कोणतीही आस न ठेवता तेथील जेष्ठ मंडळींनी एकत्र येऊन म्हटलेले सामुहिक पठण….
अनाथ आश्रमात सहा महिन्याच्या बालकाच्या आवाजापासून ते छोट्या लहानग्यांच्या आवाजातील बोबडे बोल….
कुष्ठरोगी, अपंग यांनी वेदनेतून ईश्वराला घातलेले साकडे…
म्हणजेच प्रार्थना…. देवाला दिलेले आमंत्रण… ज्याला तो नाकारू शकत नाही. अशा प्रार्थनेने ईश्वराच्या तरंगाचा अनुभव येतो. त्याच्यांवर भगवंताची कृपादृष्टी, कारुण्य दृष्टी असते. असा व्यक्ती एकटा असला तरी एकटेपणा नसतो. तो स्वतःमध्ये सर्वांना सामावून घेतो. स्वतःमध्ये सर्वांना सहभागी करतो. आणि यातूनच पुढच्या पायरीवरील ईश्वराबद्दलचा प्रेमभाव निर्माण होतो. ईश्वराने अर्जुनाला अशा प्रेमभावाने बांधलेले होते. जेव्हा माणसाचा कर्मयोग सुरू होतो तेव्हा ईश्वराचे प्रेम सुरू होतं…. क्रमशः
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
6 thoughts on “यस्तु अविज्ञानवान भवति अमनस्कः”
चितंनशील, अनुभवजन्य, समृद्ध लेखणी
भारतीय शिक्षण
अप्रतिम लेख. खुप सुंदर.
[20/11, 10:04 am] Shital Kodarkar: सुंदर शब्दामध्ये आवश्यक सर्व पॉईंट आले आहेत खूप छान लेख👌
[20/11, 10:05 am] Shital Kodarkar: खरचं हे सर्व समजणे काळाची गरज आहे.
जड आणि चैतन्य…
जीव आणि शिव … यांचे तादात्म्य
खूप छान…ब्रह्म समजने आणि समाधान कशात आहे हे जाणणे व्यक्तीसाठी खूप आवश्यक आहे. या लेखामध्ये विचारांची प्रगल्भता दिसून येते.