ममै वांशो जीवलोके जीवभूत: सनातन:।
साक्षात परमेश्वरानेच माणसाला त्याचा अंश मानलेले आहे म्हणून इथली संस्कृतीही त्याचीच आहे. ती मानवाला म्हणजेच समाजाला निरंतर उन्नत, स्थिर राहण्याचे मार्गदर्शन करते. आपणही आपल्याला ईश्वर शक्तीचा अंश मानून दृढ विश्वासाने त्या मार्गावर राहिले पाहिजे. या संस्कृतीच्या महान मार्गाच्या विचार सूत्रांचे पुढे प्रतिकांमध्ये रुपांतर झाले. सहाजिक कृतीत उतरले आणि आपल्या जीवन पद्धतीचा अविभाज्य घटक बनलेले आहे. पूर्वजांना या संस्कृतीवर विश्वास होता. भारताने शेकडो वर्षाच्या परकीय शासकांचे जबरदस्त प्रहार झेलूनही हजारो वर्षांची भारतीय प्राचीन संस्कृती आज उभी आहे, जिवंत आहे. अगदी आजच्या सामाजिक समस्यांची उकल या संस्कृतीच्या विचारधारेतून मिळू शकते. या विचारधारेच्या दृष्टीने कृतीयुक्त आदर्श परिपाठ म्हणून पहायचे असेल. एखादे व्यक्तिमत्व अभ्यासायचे असेल तर आपल्याला इ.स. 1725 ते 1795 या काळातील इतिहासाची काही पाने उघडावी लागतील. ही भारतीय विचारभक्ती जीवन म्हणून कशी जगता येते, याचा उपयोग लोककल्याणासाठी कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे चरित्र “ईश्वराने माझ्यावर जे उत्तरदायित्व सोपवले आहे ते पार पाडणे हे माझे कर्तव्य आहे. प्रजेला सुखी ठेवणे हे माझे काम आहे” हे त्यांच्या राजनीतीचे सूत्र या विश्वासातूनच निर्माण झाले. त्यांचा जीवनातील त्याग आणि सेवा ही ईश्वर समर्पित§ होती. जे काम करायचं आहे ते चांगले काम करावयाचे आहे तर त्याच्या मोबदल्यात मी काही घेत असेल तर ते चांगले काम कसे असू शकते! म्हणजे भोग व भाव अवस्था संपून रूपांतरीत झालेली त्यांची ही देवभक्ती समर्पित देशभक्ती बनली होती. त्यांच्या प्रत्येक ती कार्यात दिसून येते. अगदी त्यांच्या पत्राची सुरुवात ‘श्री शंकर आज्ञेवरून’ या मायन्याने होत असे. श्री महादेवाच्या आज्ञेवरून हे पत्र पाठवत असलेला असल्याचा भाव त्यांच्या हृदयात जागृत होता. आज जिथे छोट्या छोट्या कामांसाठी नावाचा आग्रह केला जातो. तिथं त्या पत्राच्या शेवटी सुद्धा अहिल्यादेवी स्वतःचे नाव अथवा सही करत नव्हत्या फक्त श्री शंकर असे लिहीत होत्या. याचे कारण हिंदवी स्वराज्याचे अधिष्ठान हे मुळातच ईश्वरीय आहे असा विश्वास. अहिल्यादेवी राजघराण्यातील असल्या तरी त्यांचा पिंड हा धार्मिक व आध्यात्मिक होता. स्नानाने शरीरशुद्धी, ध्यानाने मन शुद्धी आणि दानाने धनशुद्धी होते असा त्यांचा विचार होता. अशा इतिहासाच्या शुद्ध पानांबद्दल आपण गौरव बाळगून, अस्मिता ठेवून हा कर्तुत्वाचा सुगंध सर्वत्र दरवळला पाहिजे.
अहिल्यादेवींचा जन्म 31 मे 1725 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला. वडील माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई यांनी त्यांना संस्कारित केले. बालपणापासूनच अहिल्यादेवी भगवान शिवशंकराच्या भक्त होत्या. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. सुनेच्या रूपाने होळकर घराण्यात कर्तबगारी आणि धर्मपरायणतेचे शुभ पाऊल पडले होते. हे पाऊल पुढे पडावे म्हणून लग्नानंतर उत्तम शिक्षण घेऊन खऱ्या अर्थाने नीतीशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, युद्धशास्त्र यामध्ये त्या पारंगत झाल्या होत्या. त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांची प्रमुख भूमिका होती. मल्हारराव होळकर स्वतः एका सामान्य घोडेस्वारापासून हिंदवी स्वराज्याचे प्रमुख सरदार आणि मजबूत आधारस्तंभ बनलेले होते. त्यांचे पती खंडेराव कुंभेरीच्या लढाईत धारातीर्थी पडले. अहिल्यादेवींची खूप इच्छा असताना देखील मल्हाररावांनी त्यांना सती जाऊ दिले नाही. सामाजिकदृष्ट्या देखील वाईट प्रथांच्या विरोधातील या घराण्याचे हे एक पाऊल पुढे होते. त्यांना राज्याच्या दायित्वाची जाणीव करून दिली आणि हळूहळू त्यांच्याकडे राज्यकारभार सोपवला. अहिल्यादेवी हिंदवी साम्राज्यातील माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. या काळात मराठ्यांचा उत्तरेत प्रभाव वाढला. तेव्हा मंदिरांचा विध्वंस तर थांबलाच पण अनेक मंदिरे पुन्हा बांधण्यात आली. या कार्यात देवीचे मोठे योगदान आहे. नव्याने अनेक मंदिर, घाट बांधली. काशी विश्वनाथ, श्री सोमनाथ, परळी वैद्यनाथ, घृष्णेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार केला. नवनिर्मितीचे हे कार्य त्यांनी त्यांच्या खाजगी खर्चातून केले आहे. सरकारी कोशातील एकही पैसा त्यांनी या कामासाठी वापरला नाही हे विशेष! राज्यातील कर पद्धती देखील अतिशय चोख होती. पिण्याच्या पाण्याचे ओळखून जलकुंड, विहिरी, बारव यांची निर्मिती केली. न्यायदानाबाबत तर त्या कर्तव्यकठोर म्हणून सर्व परिचित आहेत. कर्तव्याच्या बाबतीत नातेगोते सुद्धा त्या पाहत नसत. अधिकाऱ्यांनी सुद्धा प्रजेवर जुलून करू नये, गैरकारभार करू नये याबाबतीत त्या अतिशय दक्ष होत्या. प्रजेला सुरक्षितता देणाऱ्या अहिल्याबाई प्रजेला नैतिक, आध्यात्मिक, उन्नतीकडे नेण्यासाठी देखील प्रयत्न करत होत्या. कथा, कीर्तन, भजन, कला, साहित्य या सर्वांना प्रोत्साहन देत असत त्यामुळे महेश्वर ज्ञानसाधनेचे केंद्र बनले होते. आदर्श राज्यकर्ता उत्तम प्रशासक कुशल राजनीतिज्ञ, धर्मशील सौम्य स्वभावाच्या पण प्रसंगी तितक्याच कठोरपणे निर्णय घेणाऱ्या अहिल्यादेवी होत्या. समजुतीने आणि धोरणीपणाने राजकारण करणाऱ्या अहिल्यादेवी होत्या. रयतेला लुटणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना कठोरपणे मृत्युदंडाची शिक्षा द्यायला मागेपुढे पाहत नसत. लढणारे सैन्य ही राज्याची मोठी शक्ती असते याची जाणीव असणाऱ्या अहिल्यादेवी आपण फक्त विचारांनी मनसूबे रचण्यासाठी बळकट असून भागत नाही. फौजफाट्यासह बळकट असावे असे आग्रहाने सांगणाऱ्या अहिल्यादेवी त्यांची राजकीय दृष्टी देखील तितकीच दूरगामी होते हे लक्षात येते. दानशूर, करूणा, परोपकार भावनेने ओतप्रोत असलेल्या अहिल्यादेवी यांनी अनेक अन्नछत्रं उघडली, पाणपोया सुरू केल्या. चराचर सृष्टीत ईश्वर पाहणारा भारतीय दृष्टिकोन अहिल्यादेवींच्या जीवनात प्रत्यक्षात साकार झाला होता. म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी धार्मिकता, लोककल्याणकारी आणि न्यायाचे प्रतीक आहेत. त्याचप्रमाणे त्या सामाजिकसमरसतेचे देखील प्रतीक आहेत स्वतःच्या मुलीच्या विवाहाचा प्रसंग असेल आदीवजाती जमातींना मुख्य प्रवाहात आणणे असेल यासारख्या अनेक निर्णयावरून ते सिद्ध होते. एक स्त्री म्हणून देखील वैयक्तिक संसारिक जीवनाला सावरून, सांभाळून स्वतःला उभं केलं परंतु हे स्वतःला उभं करणं केवळ स्वतःसाठी नव्हते तर ते रयतेच्या समाजाच्या सुखासाठी होते. स्त्री म्हणून तिच्यातील उपजत क्षमतांच्या आधारे अहिल्याबाई पुण्यश्लोक आणि देवी या पदाला पोहोचलेल्या आहेत. त्या अहिल्यादेवींना शतशः नमन!
ईश्वर प्रत्येक मनुष्याला वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती देतो. ज्या मानवी जीवन विकासासाठी उपयुक्त आहेत. भगवंताने ही शक्ती कशासाठी दिली आहे याची त्या व्यक्तीला आठवण राहिली पाहिजे. आपण पाहतो आज सर्व ठिकाणी बुद्धिमान, वित्तमान, शक्तिमान, नितीमान लोकांना याची विस्मृती होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या गोष्टींची आठवण करून देण्यासाठीच तो विविध संत, महापुरुष, विभूती, मातृ शक्तींना पाठवतो. परंतु माणूस मात्र भोग आणि भाव निर्मितीपर्यंतच संपून त्या काम करणाऱ्यांना मात्र त्रास देतो. सर्वांना सुरुवातीला मूर्ख ठरवतो. पुढे भक्ती जरी निर्माण झाली तरी काही लोक केवळ मान देतात, त्याचे पूजन करतात पण त्याचे ऐकत नाहीत त्या सिद्ध झालेल्या वाटेवर म्हणूनच कदाचित चालू शकत नसतील का? म्हणून आपल्या अशा सर्व विस्मृती जागवण्यासाठी सर्व थोर विभूतींबद्दल भगवान सर्वांना स्मृती मान करो! योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता निर्माण करो! यासाठी आपल्या सर्वांमध्ये भगवंताचा अंश आहे या त्याच्याशी असलेल्या संबंधाची स्मृति राहो! आणि मानवास दिलेल्या संस्कृती कृपाप्रसादाची जाणीव राहो!
या कृपाप्रसादाच्या जाणिवेतूनच प्रजेचे सुख हेच आपले सुख मानत अहिल्यादेवीने संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी समर्पित केले. 13 ऑगस्ट 1795 रोजी हा अध्यात्मिक अध्याय संपला.
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024