गुरुपौर्णिमा…

आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा, व्यासपौर्णिमा असे म्हटले जाते. व्यासांचे नाव कृष्णद्वैपायन असे होते. त्यांनी वेदांचे संकलन, संपादन करून चार वेदांमध्ये विभागणी केली. त्यामुळे त्यांना व्यास असे नाव पडले. व्यासांच्या या कार्यामुळे वेदांचे अध्ययन सोपे झाले. यासाठी व्यासांनी साऱ्या भारतभर भ्रमण केले शहरे, गाव, पाडे,वस्त्या जिथे जिथे मिळतील तिथून वेद संहिता मिळवल्या व त्यांचे संपादन केले. सामान्य लोकांमध्ये वेदांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. व्यास महर्षींनी महाभारताची रचना केली. 18 पुराणे, भागवत, उपनिषदे यांची रचना केली. महाभारतात तर विज्ञान, सामाजिक शास्त्रे, तत्त्वज्ञान, अध्यात्म अशा जीवनाशी निगडित सर्व ज्ञान शाखांचे सखोल विवेचन आहे. जगातील सर्व ज्ञान व्यासांच्या मुखातून बाहेर पडले आहे असे मानतात. धर्म ,अर्थ, काम, मोक्ष या चार पुरुषार्थांवर आधारित हिंदू जीवन पद्धती व राष्ट्र जीवन यांचे यथार्थ दर्शन व्यासांनी महाभारतातून घडविले म्हणून ते खऱ्या अर्थाने समाजाचे, समाजजीवनाचे गुरु आहेत म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आजही व्यासपूजन केले जाते.

गुरु शिष्य परंपरा हे आपल्या समाजाचे एकमेद्वितीय असे वैशिष्ट्य आहे. चारित्र्यसंपन्न राष्ट्र निर्माण होण्यासाठी त्या राष्ट्रावर पिढ्यानपिढ्या श्रेष्ठ जीवनाचे संस्कार घडविण्याची आवश्यकता असते. त्यासाठी प्राचीन काळातील दृष्ट्या ऋषीमुनींनी असे शिक्षण देण्याची व्यवस्था ऋषींच्या आश्रमातून केली. शिक्षण घेणाऱ्या शिष्यांना नागरी व संसारिक मोहापासून दूर ठेवले व त्यांचे लक्ष केवळ ज्ञानार्जनाकडे केंद्रित व्हावे यासाठी हे नागरी वस्ती पासून दूर निसर्गाच्या सानिध्यात ठेवले. त्यावेळी शिक्षण विनामूल्य दिले जाई. तक्षशिला, नालंदा यासारखी विद्यापीठे व त्यांचे आचार्य सर्व क्षेत्रातील शिक्षणासाठी जगभर प्रसिद्ध होते. त्यामुळे  शिष्यांचे  जीवन अनुशासनबद्ध होते. या शिक्षण पद्धतीत गुरुचे स्थान अनन्यसाधारण होते. गुरुला शिष्याचा अध्यात्मिक पिता मानला जाई. शिक्षण पूर्ण झाल्यावर शिष्य कृतज्ञतापूर्वक गुरुचे पूजन करून गुरुदक्षिणा अर्पण करत असे. प्राचीन काळात गुरु शिष्यांची नाते पिता पुत्रांप्रमाणे ह्रदयस्त होते.

परकिय आक्रमणानंतर  काळ बदलला त्यात गुरुकुले, गुरु -शिष्य परंपरा नष्ट झाल्या. तसेच ब्रिटिशांच्या काळात मेकॉलेने भारतातील लोकांची अस्मिता नष्ट करून त्यांच्या मनात ब्रिटिशांबद्दलची एक श्रेष्ठत्वाची भावना आणि आपल्याला आपल्याच बद्दल, स्वतःबद्दल हिनतेची भावना निर्माण करणारी शिक्षण पद्धती सुरू केली.  स्वातंत्र्य मिळाल्यावरही दुर्दैवाने मेकॉलेची पद्धती चालू ठेवली गेली त्यामुळे प्राचीन काळातील समर्थ चारित्र्यसंपन्न माणूस घडविण्याचे काम मागे पडले. त्याचबरोबर निस्वार्थपणे विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी गुरुकुलदेखिल राहिले नाहीत. सामाजिकतेचे संस्कार लयाला जाऊ गेले.
ते पुन्हा मिळविण्यासाठी, या परंपरा सुरू ठेवण्यासाठी, ज्ञान मिळविण्यासाठी अगदी सुरुवातीला आपल्या मधील काही गुणांचा त्याग करावा लागतो. समर्पण करावं लागतं. ही एक पवित्र आणि उदात्त भावना आहे. त्याग आणि समर्पण यात फरक आहे. त्यागामध्ये मी त्याग केला असा अहंभाव असतो. समर्पणात मोबदल्याची अपेक्षा नसते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राणार्पण केले ते काही मोबदला मिळेल या अपेक्षेने नव्हे हे त्यांचे देशासाठी संपूर्ण समर्पण होते. मी राष्ट्राचा व माझे आहे ते राष्ट्राचे असा भाव समर्पणामध्ये असतो. या दृष्टीने सर्वांमध्ये भाव निर्माण व्हावा म्हणून ही परंपरागत चालत आलेली आहे या उद्देशाने  व्यासपुजा आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे.
आदर्श गुरू हा शिष्याला केवळ माध्यम न करता स्वयंप्रकाशित करतात. अशी गुरू शिष्य परंपरा भारतात आजही अखंड सुरू आहे….प्रभु श्रीरामाचे गुरू वसिष्ठ होते; तर श्रीकृष्णाचे गुरु सांदिपणी मुनी होते. राजा जनक – अष्टावक्र, चंद्रगुप्त- चाणक्य, संत ज्ञानेश्वर- श्री निवृत्तीनाथ, संत नामदेव- विसोबा खेचर, कबीर- रामानंद स्वामी, गुरूनानक- संत रैन, स्वामी विवेकानंद- रामकृष्ण परमहंस…. या गुरू शिष्यांच्या जोड्या याच दृष्टीने भारतवर्षात प्रकाशमान होऊन सिद्ध आहेत.

शिष्यात आणि गुरुमध्ये एक अंतर असते .गुरु आपल्यापेक्षा ज्ञानमय, तेजोमय, प्रेममय असतो तर याउलट आपण अज्ञानी, निस्तेज आणि निष्प्रेम आहोत. जर आपल्याला तसं बनायचं असेल तर आपल्यातील भाव जागृत करायला हवा. जीवन म्हणजे काय हा भाव जागृत कसा करणार! तर जीवन कृती आहे, भावना आहे, विचार आहे हे समजून घेतले पाहिजे.जीवनात भावना, कृती आणि विचार या तिन्ही मध्ये प्रमुख स्थान कोणाचं आणि गौण स्थान कोणाचं याचा विचार केला पाहिजे. आहेच रूपांतर नाही मध्ये आणि नाहीच रूपांतर आहे मध्ये करणे याचं नाव जीवन. अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये अनेक जीवन प्रवाह सतत सुरू असतात उदा:- मी कंगाल आहे, मी पैसेवाला नाही, मी आजारी आहे, निरोगी नाही. आहे आणि नाही म्हणजे मी जो नाही त्याचं आहे मध्ये रूपांतर करणे म्हणजे जीवनशिक्षण. यासाठी गुरू महत्वाचा आहेच पण असा भाव असणारा शिष्य बनणे ही तितकेच महत्त्वाचे आहे . नाहीची तीव्रता जेवढी जास्त तेवढी आहे मध्ये रूपांतर करण्याची तीव्रता वाढेल. त्यामुळे ही तीव्रता ज्याच्यामध्ये जास्त असेल तो खरा शिष्य… कारण तो जास्त ज्ञान मिळवणार.

मानवी जीवन ही भावना आहे. या भावनेतूनच कृती येते आणि कृती करण्यासाठी बुद्धीची गरज असते. माझ्याकडे काय नाही हे सांगण्यासाठी गुरु पाहिजे. माझ्याकडे असं काय वाईट आहे जे नसलं पाहिजे हेही सांगण्यासाठी, समजावण्यासाठी गुरु आवश्यक असतो. तसेच माझ्याकडे जे आहे त्याचा उपयोग कसा करावा हे देखील मी शिकण्याची गरज आहे.जीवन व्यवहाराचं जेवढं उदात्तीकरण होईल तेवढ्या प्रमाणात आपण वर जाऊ, उन्नत होऊ आणि म्हणून आहे आणि नाही हे दोन्हीही जागृत करायला हवेत.
जीवनात या ज्ञानाचा स्पर्श झाला की अनपेक्षित बदलही होत असतो. वाल्याकोळीचा वाल्मिकी ऋषी झाला कारण त्याच्या जीवनाला गुरूचा हा स्पर्श झाला होता. क्रौंच पक्षाची जोडी क्रीडा करत होती. त्यातील एकाला पारध्याने मारलं ते पाहून वाल्मिकींच्या हृदयातून आर्षवाणी प्रसवली. तेच महान काव्य बनलं. ते म्हणजे रामायण… या वाल्मिकींना विचारा की त्यांनी पूर्वा आयुष्यात किती निरापराधि जीवाला मारलं होतं. पण वाल्याकोळी ज्ञान स्पर्शामुळे, गुरूमुळे वाल्मिकी बनला आणि त्यामुळेच निरपराध पक्षाला पारध्याने मारलेले पाहूनही त्यांचं हृदय करूणेने व्यापलं होतं.

आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांना व्यक्तींना लक्षात आलं पाहिजे ही संस्कृती माझ्यासाठी आहे.माझ्यात चांगला बदल करण्यासाठी आहे . आमच्या सुखासाठी आहे. संस्कृती आमच्या सगळ्यांच्या सौख्यासाठी आहे. म्हणून तर आम्ही भारतीय पद्धतीने जगतो.भारतीय इतिहासात ही जीवननिष्ठा, जीवनदृष्टी आणि मनाचा भक्कमपणा पावलोपावली या संस्कृतीतून दिसून येतो.सध्या होते काय की, माणसाचा माणसावर, स्वतःवर विश्वास नाही, श्रद्धा नाही त्यामुळे धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि अन्य सगळ्याच प्रवृत्ती मध्ये माणूस केवळ भौतिक वादाचा आग्रह धरून बसलेला आहे. मुळ श्रद्धा सोडून अंधश्रद्धमुळे स्वत्व ,सत्व गमावत आहे.स्वतःचं नाव आणि मोठेपणा कसा वाढेल हेच तो पाहत असतो. यासाठी दिव्यता आणि तेजस्विता सांभाळणारे गुरुही गावागावात असले पाहिजेत. तर ते गावागावांमध्ये असे शिष्य तयार करतील.मग शिष्यांनी गुरूचेच का ऐकायचे! आपलं भारतीय तत्त्वज्ञान फार बारकाईने अभ्यासले की सगळी उत्तरं मिळतात.
राजशासन आणि यमशासन याच्याहूनही वर एक असते ते म्हणजे गुरुशासन.राजशासनापासून सुटका नाही अगदी आपल्याला धरून कोर्टात खेचतील! चल याचा जबाब दे! म्हणतील कारण असं राजा अधिकारवाणीने बोलू शकतो. जे काही आपले कर्म, काम, पाप आहे त्यासाठी यमाचेशासन आहे. राजा जसा अधिकारी आहे तसा यमपण अधिकारी आहे यामुळे यांचे मानल्याशिवाय  आपले भागत नाही. राजशासन आणि यमशासन ही शक्तीशासन आहेत मात्र त्याच्याहून वरचे एक शासन आहे ते म्हणजे गुरू शासन.समजा तुम्ही गुरुचं ऐकलं नाही तर गुरु काही बोलणार नाहीत, आत्ताच्या काळात तर शिक्षा देखील करणार नाहीत, शापही देणार नाहीत याचं कारण गुरूचं प्रेम शिष्यांवर आहे. मात्र ज्याच्यापाशी कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही आणि तरीही त्याच शासन मान्य करणं, ऐकावं असं वाटणं,तशी भावना निर्माण होणे ही माणसाची खरी डेव्हलपमेंट असते. विकास असतो. राजशासन आणि यमशासन हे ईच्छा नसली तरी मानावंच लागतं परंतु गुरूशासन हे त्यावरचं आहे कारण ते बुद्धिशासन आहे. तो माणूस स्वतःहून मानतो.  यातच त्याचा नकळत विकास घडतो.  म्हणून गुरु आणि शिष्य ही परंपरा आपल्याकडे पूर्वीपासून आजपर्यंत चालत आलेली आहे.कारण ती सर्व मान्य आहे. यामुळे माणसाला स्वतःची चूक स्वतःला समजू शकते. त्याच्या लक्षात येतं की गुरुने ही गोष्ट सांगून ठेवलेली आहे. वास्तविक मी गुरूला सोडून दिले तर मला कोण विचारणार आहे? उद्यापासून मी त्याच्याकडे जाणार नाही असं जर मी ठरवलं तर माझा हा विकास खुंटणार आहे.  त्याच्याही वरचा जर विकास मला घडून आणायचा आहे तर मला आत्मशासन करावं लागेल म्हणून तर मी स्वतःहून प्रयत्न करेन. कारण गुरुचा आपल्यावर काही प्रभाव असतो. गुरुच्या कर्तुत्वाची, त्याच्या चारित्र्याची आपल्यावर एक पकड असते त्यामुळे आपण त्याचं थोडं फार तरी मानतो. पण जरा खोलात जाऊन विचार केला तर गुरु शासन हे बुद्धी शासन आहे ते सर्वश्रेष्ठ आहे.

आजुबाजूच्या परिस्थितीत जुनी मूल्ये पटापट कालबाह्य होत आहेत म्हणून आंधळेपणाने जुन्या, त्याज्य मूल्यांना पकडून बसनही योग्य नाही मान्य! परंतु अर्थात पूर्वजांनी जे केलं त्याचा अनुभव घेऊन मग नवीन तरी तसं काही करण्याची हिंमत दाखवायला हवी. समजा वेगळ नवं काही करता नाही आलं पण पूर्वजांनी जो मार्ग जो दाखवला आहे. त्या रस्त्याने जाणे येणे बंद झाल्यामुळे त्यावर गवत वाढलं आहे. कोणी फिरकले नाही म्हणून आपण जावं. पायवाट तयार करावी. हळूहळू येणं जाणं वाढल्याने मोठा रस्ता तयार होईल. हा विचारही लक्षात आला पाहिजे. त्या मार्गाचा फार बारकाईने भिंगाखाली धरून अभ्यास करायला हवा. निरीक्षण करायला हवं. ऋषी, पूर्वज याच रस्त्याने गेलेत हा मार्ग सामुदायिकतेचा आहे. म्हणून पुन्हा पुन्हा त्याच स्मरण करून घेणं आवश्यक असतं.पण या अर्थाने विचाराने संस्कृती इतिहास आपण वाचतच नाहीत. त्याची चिकित्सा करत नाहीत. आपल्याला माहिती नाही म्हणून अभिमान वाटत नाही.आपण दुसऱ्या देशांचा इतिहास वाचतो. एका मुलाला आपल्या वर्गातील 45 मुलांच्या वडिलांची नावे पाठ असतील पण त्याला स्वतःच्याच वडिलांचे नाव ठाऊक नसेल तर…. आपलीही तशीच गत तर नाहीं न्… ज्या देशाला दहा-दहा हजार वर्षाची परंपरा आहे. त्याचा इतिहास कोणी शिकवितच नाही. अशा तऱ्हेने इतिहास शिकवावा असं कुणाला वाटतही नाही आणि शिकावा असेही कोणाला वाटत नाही.
यासाठी आधी पंचेद्रियांचे उदात्तीकरण केले पाहिजे. तर इंद्रिये प्रभावशाली होतात. उदा:- मला माझ्या वाणीद्वारे सांगता आलं पाहिजे, कानाद्वारे ऐकता आलं पाहिजे,.माझे नेत्र उलटे-सुलटे काही पाहणार नाहीत. डोळे ही एक मोठी शक्ती आहे म्हणून डोळे, तेजस्वी, मृदू, प्रेमळ व भाववाही राहतील असा प्रयत्न करायला हवा. अशी दृष्टी झाली तर संपूर्ण सृष्टीतलं चांगलं दिसायला लागतं. माता व पिता जे आपले पहिले गुरू आहेत यांच्याकडे उपयुक्ततेच्या दृष्टीने पहायचे आणि त्यांना नमस्कार करायचा हे आपोआपच मग योग्य वाटणार नाही. जगातली प्रत्येक वस्तू आपल्याला विचारते की माझ्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतोस/ पाहतेस. भोगाने, भावाने की भक्तीने ज्या दृष्टीने आपण प्रत्येक वस्तूकडे पाहत असतो त्यावरून आपण कोणत्या संस्कृतीचे आहोत हे ठरते. कानाने देखील काहीतरी चांगले ऐकायला मिळाले तरच त्या कानाचे उदात्तीकरण झाले असे म्हणता येईल. मग असंच प्रत्येक इंद्रियांच्या बाबतीत आहे. इंद्रिय जशी विकसित करायला हवी तसे मनही विकसित करायला हवे. कारण या इंद्रियांच्या जवळच मन आहे. मनाचे सहकार्य असेल तरच इंद्रिय चांगली होतील. आपल्याला रस्त्याने जाताना एखादे वेळेस एखाद्या महापुरुषाची भेट होते. आपले डोळे त्यांना पाहतात सुद्धा पण मन दुसराच काही विचार करत असेल तर समोरून कोण गेले आहे, समोरून काय सांगत आहे हे ध्यानात येत नाही. तसेच मन दुसऱ्याच ठिकाणी गेलेले असेल तर मग अगदी खाण्यातही लागणार नाही, झोपेतही लागणार नाही. ज्या ज्या इंद्रियांनी आपण ज्ञानग्रहण करतो त्याच्यासोबत आपल्या मनाचा भाव असला पाहिजे. आपलं मन असलं पाहिजे. या सगळ्यांनी मिळून एक उत्तम शिष्य बनण्यासाठी, या सगळ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपली बुद्धी काम करत असते. म्हणून मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी बुद्धी एका यंत्रासारखी, बुद्धी एक टूल्स म्हणून वापरता आली पाहिजे. मनाचे सहकार्य नसेल तर सर्व निरोपयोगी एकटी इंद्रिय काय करणार? एखादा माणूस प्रवचन ऐकायला येतो. शब्दांचा व त्याच्या इंद्रियाचा संबंधही येतो. परंतु त्याचे मन दुसरीकडे गेलेले असल्यामुळे त्याला सहकार्य देत नाही. त्यामुळे त्याला त्यातले काही कळत नाही. मनामध्ये प्रचंड शक्ती आहे आणि या मनाला विकसित करून आत्मशक्तीकडे जाण्यासाठी आपल्या भारतीय सनातन संस्कृतीमध्ये अशा कार्यक्रमांची, उपक्रमांची अशा सण समारंभाची रचना केलेली आहे. त्या दृष्टीने आपण समजून घेतले पाहिजे. यातल्या अंधश्रद्धा, निरुपयोगी भाग नवीन पिढीने काढून टाकला पाहिजे. परंतु हे आपल्या विकासासाठी आहे हे सूक्ष्मतेने जाणून मग ते साजरं केल्या गेलं पाहिजे.
गुरुपौर्णिमेचा हा उत्सव आपली जीवनदृष्टी घडवणारा, विचारदर्शन घडवणारा, मानवी मूल्य रुजवणारा संस्कार पाठ आहे. प्रशिक्षक, शिक्षक, आचार्य, गुरु,  या सर्वांकडे एकाच मूल्याने पाहिले पाहिजे.आपली प्रत्येक कृती, कार्य ,कर्म काही विशेष साध्य करण्यासाठी आहे ते मानवी कल्याण साधनारे, जीवनात मांगल्य निर्माण करणारे, दुःख, कष्ट दूर करणारे असावे. यासाठी माणसाला चांगले वाईट यातील भेद समजण्यासाठी, यासाठी काही सुचिता, संहिता आणि मार्ग तयार केले त्यावरून चालण्यासाठी एक जीवन पद्धती तयार केली. ही जीवनपद्धती आम्ही भारतीयांनी अंगीकारली आणि म्हणून आम्ही या सण उत्सवांकडे या दृष्टीने पाहिले पाहिजे. त्या प्रत्येक कृतीतील कार्यकारण भाव आम्हाला समजला पाहिजे. आणि तो भाव समजून आमच्या उतरून आम्ही तो कृतीतूनही दाखवला पाहिजे.यासाठी अनुभव, संशोधन, साधना,सराव, स्वाध्याय, अभ्यास याच्या साह्याने ते रुजवलं पाहिजे. यासाठी गुरूची आवश्यकता आहे. यासाठी प्रत्येक क्षेत्रातील मनुष्य निर्माणाच्याया कार्यातील या मार्गदर्शी, पाठदर्शी, भूमिकेतील प्रयोगशील, अनुभवसंपन्न तज्ञांना आपण गुरूंचा दर्जा दिला आहे. आपल्या जीवनाला तशी दिशा देणाऱ्या माता, पिता, शिक्षक, संत, सज्जन, अगदी निसर्ग या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा आजचा दिवस.
या अध्यात्मिकतेच्या संस्कारावरून बुद्धिमत्तेकडे आपल्या मनाला वळविले पाहिजे. म्हणजे शहाणपण आणि करुणेची अशी क्षमता जी आंतरिक आणि बाह्य शांततेस कोणत्याही परिस्थितीत अबाधित ठेवते. म्हणजे आपला विकास व्हायला सुरुवात होतो. हे योग्य सरावातून होतं आणि हा सराव आपल्याकडून वारंवार केल्या जावा म्हणून धर्मामध्ये अशा पद्धतींच्या सण उत्सवांची रेलचेल आहे.  ते इतक्या विश्वासाने ते साजरे केल्या गेले पाहिजेत. तो भाव आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे.

( यातील काही माहिती स्वाध्याय परिवार तत्वज्ञान मधून संग्रहीत केलेली आहे.)

 

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

3 thoughts on “गुरुपौर्णिमा…”