कृष्णाई…

 

 

 

पौराणिक, ऐतिहासिक, समृद्ध नैसर्गिक आणि तिर्थाटन – पर्यटनाच्या दृष्टीने जगभर नावाजलेलं असं विलोभनिय क्षेत्र, महाबळेश्वर. अनेक पूरातन मंदिरांचा वारसा असणाऱ्या या भागात १९५८ साली उत्खननात एक मंदिर आढळले.
हे मंदिराचे ठिकाण अगदी उंच पर्वताच्या माथ्यावर आहे. चहुबाजूंनी विशाल वृक्षांची सावली त्याच्या मध्यभागी मंदिर स्थान. आजूबाजूला उंच पर्वतरांगानी वेढलेला सपाट भुभाग परिसर, विविध पक्षी, स्ट्रॉबेरीची शेती, थंड हवा एकूण सारे वातावरण शांतचित्त वाटते.
हे मंदिर जमिनीलगत दिसणारे आणि वरवर पहातांना जरी ते जमीनीवरचे सामान्य मंदिर असे भासले तरी भूगर्भात मोठा भाग आणखीनही कोणत्या तरी स्वरूपात असू शकतो हे सहज ध्यानात येते.
हे मंदिर मागील दहा वर्षापासून भक्तांना दर्शनासाठी खुले केलेले आहे. त्या अगोदर उत्खनन व डागडुजी सुरू होती.
अतिशय पुरातन पांडवकालीन मंदिर आहे.
दाट झाडीतून पायवाटेने, लालसर पिवळ्या रंगाच्या पायर्या उतरून या मंदिर स्थानाकडे जावे लागते. पुर्वीची प्रसिद्ध मंदिरे आहेत तिथूनच अगदी 200 मीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
प्रथमदर्शनी नजरेस पडते ते पुर्णाकृती चौकोनी मंदिर. आयताकृती अखंड मोठे चिरे रचून सलग लांब व उंच भिंती रचलेला बाह्यभाग. मुख्य प्रवेश द्वाराजवळ गेल्याशिवाय मंदिराच्या भोवतालचे काहीही दृष्टीस पडत नाही… अशी या भिंतीची रचना आहे. मंदिराच्या शिखर अगदी साधे आहे. सध्या माहिती असलेल्या कोणत्याही पद्धतीचे कोरीव काम नाही… किंवा छोट्या मुर्त्या असंही नाही…
मंदिराच्या समोर प्रवेश केला की मोठ्या राजदरबारात असतात तश्या अनेक कमानी अन समोर ओसरी दिसते…
मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये किंवा मंदिराच्या बाहेरच्या मंडपामध्ये ज्या पद्धतीचे कमानी दरवाजे आणि सभामंडप आहे विलोभनीय आणि अप्रतिम आहे. या कमानी ज्या खांबावर उभ्या आहेत त्या खांबावरील काम सुद्धा अगदी इतरत्र न आढळणारे आहे. त्यामुळे विश्वास बसतो की हे मंदिर इतर मंदिरांपेक्षा निश्चितच पुरातन आहे.
अनेकांना यज्ञआहूती समयी उपस्थित रहाता येईल असा भव्य सभामंडप, पाषाणातील यज्ञस्थानात पाषाणाचे यज्ञकुंड…
मंदिराच्या बाहेरूनच उजव्या बाजूस एक खोल कुंड आहे. त्या लगत एक चौथरा आहे.

मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सात ते आठ फूट खोल असे तीर्थ आहे. या तीर्थामध्ये देखिल जमिनीखाली अनेक झरे एकत्र येतात.
या तीर्थास सगळ्या बाजूने जोडलेल्या अखंड पाषाणाच्या पायर्या आहेत. कोणत्याही बाजूने खाली उतरून जाता येते. मंदिराच्या प्रवेशद्वार समोरच यज्ञकुंड आहे. यज्ञकुंडाला लागूनच एक पायरी उतरले की गोमुख आहे.. इतर मंदिरात आढळून येते तसेच गोमुखातून जरी पाणी येत असले तरी या ठिकाणी पुर्ण गोमातेचे रूप आपल्याला दिसते. पाषाणातील कोरलेल्या गोमातेच्या शेपटीचे केस पिंजारल्यासारखे दिसतात. यावरून लक्षात येते की कलेचा सुरेख नमुना ही भारतीयांचे पुरातन काळापासून विशेष कौशल्य आहे…
या मंदिराचे आणखी एक वेगळेपण म्हणजे मंदिरामध्ये प्रवेश करताना जसं प्रत्येक मंदिरात मुख्य गाभाऱ्याला लागूनच नंदी असतो इथे मात्र महादेवाची पिंड मग गोमातेचे रूप, तीर्थ आणि मंदिरातून बाहेर पडत असताना नंदी आहे. महादेवाची पिंड आणि नंदी या दोघांमध्ये बरेच अंतर आहे.

*कृष्णाई मंदिर* असे या मंदिराचे नाव जरी असले तरी प्रत्यक्ष हे महादेवाचे मंदिर आहे.
गाभाऱ्याचे प्रवेशद्वार दोन फूट रूंद आणि पाच फूट उंच आहे.
आत प्रवेश केल्यानंतर मात्र
अलौकिक, अद्भुतरम्य, ऊर्जादायी लहरी जाणवतात. जणू तो जुना काळ, वेळ आपल्यासाठी थांबली आहे. आपल्या भोवती काहीही नाही. आपण कोणीही नाहीत. फक्त शांतता… या अनुभूतीला छेद देणारे काहीही दिसत नाही, स्मरत नाही, ऐकू येत नाही, जाणवत नाही….
फक्त ध्यान, आपण आणि ती थंडगार चित्तशांतता…
असं आपण किती वेळ राहू शकतो! ते आपल्यावर आहे..
भौतिक जगाची जाणीव व्हायला लागली की मग पुन्हा निरीक्षण, माहिती घेणे सुरू होतेच… या दृष्टीने जुनी पुरातन मंदिरे, खंडहर जरी पाहिले अगदी पडझड झालेले अवशेष जरी पाहिले तरी भकासपणाला थारा नसतो.
इथली महादेवाची पिंड मोठी, सुंदर, रेखीव आहे.
कमळाच्या फुलाच्या भव्यआकारावर हे शीवलिंग विराजमान आहे. हे कमळाचे फूल देखिल उंच ओट्यावर आहे. सहसा मंदिरात महादेवाची पिंड जमिनीलगत असते परंतु इथे तसे नाही. हे वेगळेपण पहाताक्षणी लक्षात येते.
शीवलिंगाच्या पाठीमागे देवळीमध्ये ठेवलेली श्री गणेशाची कोरीव पाषाणमूर्ती आहे.
याशिवाय गाभाऱ्यामध्ये इतर मंदिरात दिसते तसे छत नाही तर भौमितीक आकारामध्ये लांबट दगड रचून बांधनी केलेली दिसते. या पिंडीच्या खाली जे झरे आहेत त्यापासून कृष्णा नदीचा उगम झाला आहे असे सांगितले जाते. महादेवाच्या पिंडी पासून उगम पावलेली कृष्णा नदी…
नदीच्या उगमाजवळून, उंच माथ्यावरून कृष्णा नदीचे नागमोडी विस्तीर्ण पात्र सहज नजरेस पडते.
या मंदिराची पडझड झालेली नाही किंवा परकीय आक्रमणही झालेले नाही. त्यामुळे या मंदिरातील कलाकुसर, अखंड पाषाण साबूत आहेत. केवळ दीर्घ कालीनतेमुळे दगडांची झीज मात्र झालेली दिसून येते तसेच समुद्रालगतच्या प्रदेशात किल्ल्यांच्या बांधकामाला ज्याप्रमाणे बारीक छिद्र/जाळी पडलेली असते तसेच या मंदिराच्या पाषाणांना बारीक छिद्र /जाळी पडलेली दिसते. विशेष करून मंदिराच्या बाहेरील बाजूसच दगडांना छिद्र पडल्याचे जाणवते. आतल्या बाजूचे पाषाण मात्र एकदम काळे कुळकुळीत आणि हात फिरवला की मऊशार लागतात.
खरे तर या मंदिराचा पुरातत्व विभागकडून ऐतिहासिक, पौराणिक पद्धतीने अभ्यास होणे गरजेचे वाटते. एक साधारण पर्यटक म्हणून किंवा मंदिरांची जी स्थापत्य कला आहे त्याच्यातले वेगळेपण निश्चित जाणवते, साध्या डोळ्यांनाही दिसते.
परंतु त्याचे नेमकेपणाने वर्गीकरण करण्यासाठी सूक्ष्म निरीक्षण प्रत्येक बारकावे अभ्यासणे आवश्यक आहे. त्या कलाकृती, चित्राकृती, आकार किंवा त्यांचे स्थान या मागील त्या काळातील कालसुसंगत अर्थ, मुर्तीशास्त्र, बांधनीशास्त्र व आढळून आलेला वेगळेपणा, त्याचे विश्लेषण व विवरण, कारणे यासाठी तज्ञ मार्गदर्शक आवश्यक वाटतो. तिथे साफसफाई करणारे काका जी माहिती सांगतात ती मौखिक पद्धतीने हस्तांतरित झालेली आणि फारच त्रोटक माहिती आहे. फार वरवरची माहिती आहे असे वाटते…
बारकाईने निरीक्षण केले की मनात कुतूहल निर्माण होते.
अगदी प्राचीन शिवमंदिर म्हणून गणल्या जाणाऱ्या मंदिरापेक्षाही वेगळेपणा इथे जाणवतो…
खूप सुखद, दुर्लभ अध्यात्मिक अनुभूती देणारा मंदिराचा निसर्गरम्य निवांत परिसर, शांत मंदिर, समाधीन गाभारा, अलौकिक शीवलिंग, प्रतिस्थापित गणेशजी,
प्राचीन भारतीय मंदिर शैलीचा उत्तम नमुना पहायला मिळतो. सुंदर, अद्भुत, शांत, निवांत मंदिर  पाहण्या योग्य आहे. ज्यांना अशी मंदिरे पाहण्याची आवड आहे. त्यांच्यासाठी हे मंदिर खास पर्वणी आहे….

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

12 thoughts on “कृष्णाई…”