“अधी हि भगवो ब्रह्मेती”….

अधी हि भगवो ब्रम्हेती”!

वैभव संपन्न होणे म्हणजे काय! निसर्गाचे वैभव, अन्नाचे वैभव, भावनेचे वैभव, ईश्वर म्हणजे वैभव, मग या सर्वांना जीवनातून वजा करून कसे चालेल!
समजा उद्या आपल्या घरी एखादा ग्रेट! खूप मोठा माणूस आला… सोबत पोलीस येणार! आपली, घराची, गल्लीची,गावाची चौकीदारी सुरू होणार! आपली ऐपत नसली तरी लोकचं आपले घर सजवून देणार! मदत करणार, रस्ता नीट केला जाईल, रांगोळ्या काढल्या जातील, जर ही स्थिती केवळ मोठ्या व्यक्ती येणार म्हणून होत असेल तर; ईश्वराच्या येण्याने किती बदल होत असतील!!
तो येणार, येतो,आलाच पाहिजे म्हणून आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर आपोआपच
सोबत चांगले कर्म होणार, आपल्या कर्माची नीट चौकशी आपणच करणार हे सगळं कोणीही न सांगता स्वतःहून ते करणार….
आपल्या शरीराची स्थिती नसली तरी आहे त्या परिस्थितीत आपण त्याचे स्मरण करणार, कष्ट घेणार…
तसेच तो ग्रेट माणूस आपल्या घरी आला म्हणून आपण गोडधोड करतो. तो एकटा किती खात असतो फारफार तर एक किंवा दोन वाटी! पण आपण त्याच्या पुरतेच करतो का? सोबत येणाऱ्या प्रत्येकाला देखील आग्रह करून त्याच भावनेतून वाढत असतो. कारण मोठ्या व्यक्तींसोबत आलेली व्यक्तीही मोठीच असणार अशी आपली धारणा झालेली असते. अगदी असाच पाहुणचार ईश्वर देखील करत असतो. थोर पुरुषांच्या संगतीत, विचारांप्रमाणे, सहवासात राहिले की सामान्य माणसांना देखील त्या ईश्वराच्या पाहुणचाराचा लाभ घेता येतो. वैभव संपन्न होता येते. लाड होतात. सर्व काही ठीकठाक व्यवस्थित घडत जाते. गोडधोड पदार्थाप्रमाणे जीवनात गोडवा निर्माण होतो. असा ईश्वराचा पाहुणचार आणि वैभव संपन्न जीवन जगायचे असेल तर आपण आधी स्वतःला शोधता आलं पाहिजे, स्वतःभोवती फिरत फिरत स्वतःच्या आत मध्ये पहाता आलं पाहिजे. लक्ख करण्यासाठी प्रार्थन सहज भावाची असली पाहिजे. मग असा प्रेमळ पाहुणचार मिळतो. ईश्वर अशाच लोकांची वाट पाहत असतो. अशा लोकांचा समाज निर्माण झाला की कोणत्यानकोणत्या रूपात तो प्रकट होतो. मग हे सगळं शांत, निर्विकार मनाने अनुभवायचे असेल तर कोणते मार्ग आपल्याला याकडे घेऊन जातात. शरीर प्रक्रिया व्यवस्थित चालण्यासाठी आपण खुप काही करतो. व्यायाम, पथ्यपाणी, कधी बाहेरून उपचारही घेऊ शकतो पण मन, बुद्धी, ऊर्जा यासाठी??
मनाला नियंत्रित, बुद्धीला संचलित आणि ऊर्जा निर्धारित करण्यासाठी काय करू शकतो! याचाही विचार….

या विचारांवरून पुढे जाता आले की मग सोसाट्याच्या वाऱ्यात निवांत श्वास घेता येतो. भर पावसातही समोरचे स्पष्ट दिसते. वादळातही आपली क्षमता सिद्ध करता येते. सर्व भिंतीना भेद्यता देता येते.
तो रस्ता आहे…..
ध्यानाचा… ध्यानाकडे जाणारा… ध्यानापर्यंत घेऊन जाणारा…. ध्यानमय होण्याचा… याचा स्वतःच अनुभव घ्यावा लागतो. घेऊ शकतो. दुसऱ्याचे अनुभव केवळ मार्गदर्शक असू शकतात; पण मार्ग बनू शकत नाहीत. शरीर,मन, बुद्धी, ऊर्जा,आत्मा यांना एकत्रित यावे लागते. येणे आवश्यक असते. कारण फक्त तेजबुद्धी असेल तर चंचलता येते. स्थिरता कमी होते. कधी मन बुद्धीला भरकटून स्वतः व्यापते. तर असिमित ऊर्जा असेल आणि दिशा नसेल तर विध्वंस व्हायला केवळ एक क्षणही पुरून उरतो. प्रत्यक्षात देखील वेगवेगळ्या क्षेत्रातील अशी तज्ञ मंडळी सहसा एकत्र येताना दिसत नाही आणि असे घडले तर त्या ठिकाणी अलौकिक, अद्भुत, असामान्य, भूतोनभविष्यती असे कार्य घडतात असे आपला इतिहास सांगतो.
मग पुढे उत्सुकता, क्रियाशीलता, सतत कार्यरत, जिज्ञासा, नम्रता ,स्पष्टता, ऊर्जा, मन, बुद्धी, आत्मा, शक्ती हे सगळं असून देखील आपलं शांत मन एकत्रित व्हावे लागते. आपल्याला कोणीही रोखू शकत नाही कारण ही शांतता स्वतःला हवी असते. यात बाहेरून कशाचा अडथळा देखील निर्माण होऊ शकत नाही. कारण स्वतःला आतून शांत व्हायचं असतं. शांत, उत्साही प्रवाह जिथे असू शकतील तिथे अवतीभवती आनंद निर्माण होत असतो हे त्याच लक्षण आहे. मग भय, ताण, राग, द्वेष, ईर्षा, अवहेलना, मान, अपमान, वेदना, दुःख, संघर्ष, अहंकार या भावनांचे महत्त्व गळून पडते; आपण हलके हलके होत जातो. स्वतःभोवती मोकळेपणाने फिरू शकतो. शांत रहाणे, होणे म्हणजे ही शांतता आपल्याला लेचेपेचे बनवत नाही तर आत्मविश्वास, खंबीरपणा, दृढनिश्चयी बनवते. जितके संवेदनशील तितकेच खंबीर! अगदी मृत्यूची भीती घालवणारी निर्भयता आपल्या अंगी येते. स्वतःभोवती फिरत फिरत, सरळ भक्ती, सहजभावाची प्रार्थना आपल्याला ईश्वराची प्रिय बनवून ठेवते. ही प्रियता समोरचा कसा वागतोय यापेक्षा आपण कसे आहोत याचे भान देते.
यासाठी खूप छान उपनिषदातील एक गोष्ट आहे….

प्राण, तप, अन्न हे ब्रह्म आहे याचा अभ्यास केल्यानंतर, जाणून घेऊन तसे जीवन बनवल्यानंतरही समाधान न झाल्यामुळे भृगु यांनी आपल्या वडिलांना प्रश्न विचारला,” अधी हि भगवो ब्रह्मेती?”
म्हणजे मला ब्रह्म समजवा…. तेव्हा त्यांचे पिता वरूण उत्तरले,” सर्वप्रथम प्राण ब्रह्म आहे; हे तुला समजले तरीही तुझे समाधान झाले नाही. नंतर अन्नब्रह्म आहे हे समजले तरी समाधान झाले नाही. तप ब्रम्ह आहे असे समजले तरीही तुझे समाधान झाले नाही… असेच प्रत्येक अनुभूतीनंतर तुला लक्षात येईल की ब्रह्म काय आहे?? म्हणून तू अभ्यास कर… आणखी अभ्यास कर….
या गोष्टी सारखेच ध्यान आहे. ध्यान ही निरंतर होत राहणारी प्रयत्नशील प्रक्रिया आहे. ती कधीच पूर्ण यशस्वी होत नसेल ती कमी अधिक प्रमाणात होत असेल. आपण ध्यानी फार कमी होतो. ध्यानमय होण्याचा प्रयत्न करू शकतो. आपले मन, बुद्धी, शरीर, ऊर्जा,आत्मा या चारींचा एकमेद्वितीय असा योग घडावा लागतो ते एकाच बिंदूवर यावे लागतात. आपण स्वतःच्या आत पाहणे, एकत्रित होणे ही स्थिती म्हणजे कदाचित ध्यान असेल. प्रत्येकाचा अनुभव वेगळा, प्रत्येकाची पद्धती वेगळी, योग्य की अयोग्य? हे दुसरा कोणी आपल्याला सांगू शकत नाही. कारण स्वतःबद्दल माहिती असतं खरंच ध्यान होते का? काय लक्षण आहेत? काय बदल होतो आहे? याचे स्वतःपुरते आपण नोंदी घेऊन, मूल्यमापन करू शकतो.
भृगूंप्रमाणे आणखी अभ्यास करू…..सर्व एकाच बिंदूवर कधी येतात….
एकमेकांचे ध्यानमय होण्याचे अनुभव एकमेकांना समजून देऊ…क्रमशः

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

8 thoughts on ““अधी हि भगवो ब्रह्मेती”….”